डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा छेद रस्त्यावरील आईस फॅक्टरी ते सोनारपाडा रस्ता सोमवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने पुनर्पृष्ठीकरण कामासाठी हा रस्ता मागील महिन्यापासून बंद ठेवण्यात आला होता. हा रस्ता खुला करण्यात आल्याने गेल्या महिनाभर या भागात होणारी वाहन कोंडी कमी होणार आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्याने डोंबिवली, कल्याणमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे प्रशासनाने हाती घेतली आहे. २४ तास हे काम करुन दिवाळीपूर्वी सुस्थितीत रस्ते करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
मानपाडा रस्त्याची दुर्दशा झाल्याने बहुतांशी वाहन चालक पाथर्ली नाका किंवा मानपाडा रस्त्याने येऊन शिवाजी नगर आईस फॅक्टरी रस्त्याने सोनारपाडा शंकरा विद्यालय प्रवेशद्वार दिशेने शिळफाटा किंवा इच्छित स्थळी जात होते. मागील पाच ते सहा महिन्यात आईस फॅक्टरी रस्त्याची देखभाल करण्यात न आल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले होते. या रस्त्याचा पृष्ठभाग झोड पावसाने वाहून गेला होता. या रस्त्यावरुन दररोज उद्योजक, शंकरा विद्यालयाकडे जाणारे विद्यार्थी, कामगार यांची वर्दळ असते. रिक्षा चालक या रस्त्यावरील खड्डयांमुळे हैराण होते. हा मधला रस्ता असल्याने बहुतांशी वाहन चालक आईस फॅक्टरी रस्त्याला प्राधान्य देत होते.
हेही वाचा : दिवाळी भेटवस्तूंना ‘या’ पालिकेत No Entry ; कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट स्वीकारण्यास मनाई
गणेशोत्सव काळात या रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण करण्याचा निर्णय बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी घेतला होता. परंतु, वाहतूक विभागाने गणेशोत्सव काळामुळे या काळात रस्ता बंदीला परवानगी दिली नाही. त्यामुळे गणेशोत्सव होताच लोकरे यांनी वाहतूक विभागाच्या सहकार्याने हा रस्ता १५ दिवस बंद ठेवण्याची परवानगी घेतली. तातडीने या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. तांत्रिक कारणांमुळे या कामाला विलंब झाला. महिनाभर हे काम सुरू होते. हा रस्ता बंद असल्याने वाहन चालकांना वळसा घेऊन जावे लागत होते. त्यामुळे या भागात सतत वाहन कोंडी होत होती. वाहतूक विभागाने हा रस्ता लवकर खुला करण्यासाठी बांधकाम विभागाकडे तगादा लावला होता. अखेर या रस्त्याचे काम सोमवारी पूर्ण करण्यात आले, असे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले.
हेही वाचा : बदलापूर : बारवीमधील उप कार्यकारी अभियंत्याला ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
या रस्त्याच्या पुढील टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ती प्रक्रिया झाली की या रस्त्याचा पुढील टप्पा हाती घेण्यात येईल. या रस्त्याचा शेवटचा टप्पा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील आहे. ते काम बांधकाम हाती घेईल, तशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे, असे लोकरे यांनी सांगितले.
” पावसाचे प्रमाण कमी झाल्याने डोंबिवलीतील खड्डे पडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. २४ तास हे काम केले जात आहे. आयुक्त, शहर अभियंत्यांच्या आदेशाप्रमाणे दिवाळीपूर्वी डोंबिवली, २७ गाव भागातील सर्व रस्ते सुस्थितीत केले जातील.” – रोहिणी लोकरे ,कार्यकारी अभियंता ,बांधकाम विभाग, डोंबिवली