महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंगळवारी ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या ‘उत्तर सभे’मध्ये राज ठाकरेंनी मंचावरच तलवार म्यानातून उपसून उंचावल्याच्या आरोपाखाली शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता मनसेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री तसेच उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
नक्की वाचा >> “मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही असं ते म्हणाले, मी सांगू इच्छितो की…”; शरद पवारांचं राज ठाकरेंना उत्तर
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेचे ठाणे आणि पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंविरोधात तलवार उपसल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत असेल तर असाच गुन्हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलावरही दाखल करावा अशी मागणी केलीय. “सरकारच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. राज ठाकरेंना कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी व्यासपीठांवर, सभेमध्ये तलावारी दाखवल्या आहेत. मग आजच का तुम्हाला वाटलं राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करायला हवा,” असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केलाय.
“असे अनेक गुन्हा राज ठाकरेंवर आहेत आमच्यावर आहेत, पण आम्हाला काही फरक नाही पडत. मात्र जे सुरु आहे ते चुकीचं सुरु आहे. राज ठाकरेंना काही बोलल्यानंतर ते तशाच प्रकारे पुराव्यासहीत उत्तर देतात. बोलायला काही राहिलेलं नाही. मग असे गुन्हे दाखवून त्यांची लायकी दाखवत आहे. दबावाला आम्ही कधी घाबरलेलो नाही पण कीव येते जे काही हे लोक करतायत त्याची,” असा टोलाही जाधव यांनी लगावलाय.
नक्की वाचा >> “राज ठाकरेंचा जन्म झाला त्या दिवशी शरद पवार…”; राज यांच्यासोबतचा पवारांचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीचा टोला
“जर राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा. तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे, त्यामुळे जर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तसं होऊ देऊ नका, असा इशाराही जाधव यांनी दिलाय.
राज ठाकरेंविरोधात नेमका काय गुन्हा दाखल झालाय?
महाराष्ट्राच्या गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंविरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यामधील सभेमध्ये राज यांनी स्टेजवरुन तलवार म्यानातून काढून दाखवल्याने त्यांनी आर्म्स अॅक्टचं उल्लंघन केल्याचा ठपका राज यांच्यावर ठेवण्यात आलाय. तलवार दाखविल्याप्रकरणी त्यांच्यासह सुमारे १० जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरे काल साडेसातच्या सुमारास मूस रोडवरील सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचा भगवी शाल आणि तलवार देऊन स्वागत करण्यात आलं. यानंतर राज यांनी म्यानातून तलवार बाहेर काढून ती उंचावून दाखवली. याच प्रकरणी आता ठाण्यातील नौपाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नौपाडा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कायदा कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ व २५ प्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.