बकरी ईदच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्या जवळ मुस्लीम भाविक रस्त्यावर नमाज अदा करतात. यावेळी बंद ठेवण्यात येणारे दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचे मंदिर उघडे ठेवण्यात यावे, या मागणीसाठी अनेक वर्षापासून शिवसैनिकांकडून कल्याणमध्ये घंटानाद आंदोलन केले जाते. आज (रविवार) बकरी ईद असल्याने शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्याकडे जाण्याच्या लालचौकी भागात आंदोलन केले.
‘पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली उतरवून हिंदुत्वाचा नारा पुकारत मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्यांनी, एकेकाळी दुर्गाडी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी, बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीचे मंदिर उघडे ठेऊन हिंदू भाविकांवर होणारा अन्याय दूर करायला हवा होता,’ असा टोला शिवसेनेचे कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
आनंद दिघे यांनी ३५ वर्षापूर्वी आंदोलन सुरू केले होते –
शिवसैनिकांच्या आंदोलनाच्या वेळी दुर्गाडी किल्ला, लालचौकी भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टिळक चौकातून शिवसैनिक भगवे झेंडे हातात घेऊन दुर्गाडी दिशेने चालले होते. पोलिसांनी त्यांना लालचौकी येथे अडविले. घोषणा, आरती करून शिवसैनिकांनी पोलिसांच्या कृतीचा निषेध केला. ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात घंटानाद आणि आरती करण्यास बंदी घालण्यात येते. ईदच्या दिवशी दुर्गाडी देवी मंदिर उघडे ठेवा म्हणून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी ३५ वर्षापूर्वी आंदोलन सुरू केले होते. ती परंपरा आताही सुरू आहे. शिवसैनिकांना पोलिसांनी लालचौकी येथे रोखून धरले. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याचवेळी दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी ईदगाह समोर हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या मुस्लिम भाविकांनी भर पावसात नमाज अदा करत राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेसाठी प्रार्थना केली.
शिवसैनिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. आनंद दिघे यांच्या काळात जिल्ह्यातील शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होत असत. ही संख्या हळूहळू ओसरू लागल्याचे चित्र दिसून येते.
दुर्गाडीवर हिंदू, मुस्लीम समाजाची धार्मिक स्थळे असून दोघांकडून या स्थळावर आपले हक्क सांगण्यात आले आहेत. बकरी ईद निमित्त दोन समाजात कोणतेही तेढ निर्माण होऊ नये, म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी मुस्लीम बांधव नमाज पठण करतात.
त्यांचे हिंदुत्व खोटे आहे का? –
विजय साळवी यांनी सांगितले, “आनंद दिघे यांनी सुरू केलेले हे आंदोलन ३० वर्षांपासून सुरू आहे. घटनेने हिंदूंना दिलेला दर्शनाचा अधिकार हिरावला जात आहे. यावर्षी आम्हाला अपेक्षा होती. कधीकाळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे, पक्षप्रमुखांना खाली उतरवून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्यांनी हा अन्याय दूर करायला पाहिजे होता. जर खरे हिंदुत्व असते तर मंदिर उघडायला हवे होते. त्यांचे हिंदुत्व खोटे आहे का? हा प्रश्न आज पडला आहे.” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता बंड्या साळवी यांनी लगावला. “मंदिरात आम्हाला दुर्गाडी मातेच्या दर्शनाला जाऊ दिले नाही. हे सरकार जर हिंदुत्ववादी आहे तर हा अन्याय दूर करायला पाहिजे.”, अशीही मागणी त्यांनी केली.