ठाणे : हाती घेतलेली रस्त्यांची कामे विनाविलंब तसेच गुणवत्ता पूर्ण करावीत, या कामांवर कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः लक्ष ठेवावे असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. कामाची गती, गुणवत्ता यात कोणतीही तडजोड नको, असे स्पष्ट करत रस्त्यावर खड्डे पडल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नाले सफाईच्या या कामात हयगय झाली, बनावट कामे दाखवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी बैठक घेऊन त्यात बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते प्रकल्प आणि शौचालये बांधकाम यांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ठाणे शहरात राज्य सरकारकडून आलेल्या निधीतून ६०५ कोटी रुपयांची २८२ रस्त्यांवर कामे सुरू आहेत. याशिवाय महापालिकेच्या निधीतूनही रस्त्यांची कामे सुरु आहेत. ही कामे करताना नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे नेटके नियोजन करून कामे लवकर पूर्ण करावीत. रस्त्यांची कामे रेंगाळतात, गुणवत्ता राखली जात नाही, अशावेळी नागरिकांची असुविधा होते. त्यामुळे हाती घेतलेली कामे विनाविलंब आणि गुणवत्तापूर्ण करावीत, यावर कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः लक्ष ठेवावे असे आदेश त्यांनी बैठकीत दिले.

हेही वाचा – कल्याणच्या स्टेट बँकेत महिलेची दीड लाखांची फसवणूक

खड्डेमुक्त ठाण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. एकाचवेळी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते कामासाठी खोदकाम केल्यावर तो रस्ता वाहतुकीस खुला करेपर्यंतचा कालावधी कमीत कमी कसा ठेवता येईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना बांगर यांनी दिल्या आहेत.

एखादे जरी काम रखडले तर त्याचा पावसाळ्यापूर्वीच आढावा घेतला जाईल. तसेच, रस्त्यावर खड्डे पडल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कामाची गती, गुणवत्ता यात कोणतीही तडजोड नको. अडचणीचा सामना करण्याचा अनुभव कार्यकारी अभियंत्यांना अधिक आहे. कार्यकारी अभियंता हतबल झाला तर काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता मावळते. अधिकाऱ्यांनी अनेक वर्षे महापालिकेत काम केले आहे. या यंत्रणेची तुम्हाला जाण आहे. आपल्या अनुभवाचा फायदा नागरिकांच्या कल्याणासाठी कसा करता येईल, यावर लक्ष द्यावे. जर अभियंत्यांनी सगळी कामे ठरलेल्या वेळेत, अत्युच्च दर्जा राखून पूर्ण केली, त्यात पारदर्शकता ठेवली, तर नागरिकांना सुखद अनुभव मिळेल. तसेच, लोकप्रतिनिधींचेही सहकार्य मिळाल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

देयके देण्यात विलंब करू नका

ठेकेदारांची देयके अदा करण्याचे काम सुरू झाले आहे. देयकाचे पैसे दिले नाही म्हणून काम अडले ही सबब चालणार नाही. देयक सादर झाल्यापासून सात दिवसांच्या आत देयक अदा झाले पाहिजे. त्याची वैयक्तिक जबाबदारी ही विभागाची राहील. त्यात विलंब खपवून घेतला जाणार नाही. ३१ मे पूर्वी कामे पूर्ण करणे शक्य असून त्यांचा दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे. रस्त्यांची कामे सुरू असतानाच प्रभागातील खड्डे पडण्याची हमखास ठिकाणे, संभाव्य ठिकाणे यांचा प्रभागनिहाय नकाशा तयार करून त्यासाठी उपाययोजना करा. प्रभागातील प्रत्येक कामाची इत्थंभूत माहिती ठेवा. त्याचा पावसाळ्यापूर्वी पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकातील रस्त्यांवर रिक्षा चालकांची घुसखोरी

शिल्लक कामे वेगाने पूर्ण करा शहरातील सुशोभीकरणाची बहुतांश कामे पूर्ण होत आली आहेत. कापूरबावडी आणि नितीन कंपनी जंक्शन येथील उद्यानांची कामे, आनंदनगर नाका येथील दीपस्तंभ, चौकांतील शिल्पकृती यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ती कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. पुलांवरील शोभीवंत मोटीफ, लाईटच्या पट्ट्या याबाबत त्यांनी विद्युत विभागास सूचना दिल्या. तसेच, गोखले रोड आणि राम मारुती रोड येथील रोषणाई याबद्दलही काही दुरुस्तीही सांगितल्या. नालेसफाईच्या कामांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. सफाईपूर्वी आणि सफाईनंतर नाल्यांच्या स्थितीची अभ्यास करून कंत्राटदारांची देयके दिली जाणार आहेत. या कामांवर घनकचरा विभागाच्या सोबतच आपणही बारकाईने लक्ष ठेवा, असे त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If there are potholes on the road action will be taken thane mnc commissioner abhijit bangar warning to contractors ssb
Show comments