ठाणे: तुम्ही वीज चोरी करत असाल तर सावधान कारण तुमच्यावर थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकतो. ठाण्यात ८७ हजार रुपयांच्या वीज चोरीप्रकरणी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भारतीय विद्युत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वी महावितरण कंपनीच्या पथकाकडून ठाण्यात ग्राहकांच्या विद्युत पुरवठ्याच्या तपासणी सुरू होती. पथकाने नौपाडा येथील बी केबीन भागातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचे विद्युत देयक (बील) तपासले असता, त्यांचे देयक वीज वापरापेक्षा कमी येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने त्यांच्या येथील विद्युत मीटरमधील तारांची पाहणी केली. त्यामध्ये कोणताही फेरफार आढळून आला नाही. परंतु त्या तारा काढल्यानंतरही घरातील विद्युत पुरवठा सुरूच असल्याचे आढळून आले. त्यानंतर पथकाने त्यांच्या घराची तपासणी केली.

हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिकेच्या कामगारावर जीवघेणा हल्ला

विद्युत तारांमध्ये फेरफार करून वीज चोरी सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर पथकाने संबंधित व्यक्तीविरोधात विद्युत कलम १३५ अंतर्गत वीजचोरीची कारवाई केली होती. तसेच त्याचा विद्युत पुरवठा खंडीत केला होता. या व्यक्तीने सुमारे वर्षभरात ८७ हजार ९६२ रुपयांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात तडजोड रक्कम भरण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीस वारंवार संपर्क साधला. परंतु त्याने तडजोड रक्कम भरली नाही. याप्रकरणी महावितरण कंपनीच्या साहाय्यक अभियंत्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you are stealing electricity a case can be registered at the police station dvr
Show comments