ठाणे : ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सहा वर्षांपुर्वी तयार करण्यात आलेला वाहतूक आराखडा आणि शहरातील सध्याची बदललेली वाहतूक स्थिती यामध्ये मोठा फरक असल्यामुळे मुंबई आयआयटीमार्फत ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. या आराखड्यात वाहतुकीचे बदलेले स्वरूप, शालेय बसगाड्या तसेच इतर बसगाड्यांची वाढलेली वाहतूक, घनकचऱ्याची वाहतूक, बांधकामातील राडारोड्याची वाहतूक यामुळे वाहतुकीवर येणारा ताण याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. सायकल ट्रॅक, पादचाऱ्यांसाठी व्यवस्था यासह खाडीद्वारे जल वाहतुक कशी सुरू करता येईल, याचा अभ्यास यात केला जाणार आहे. याशिवाय, मेट्रो, रेल्वेपर्यंत ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची रचना, पार्किंग व्यवस्था, तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीबाबत सूचना यांचाही या फेरमांडणीत अभ्यास करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबरच शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, उरण येथील जेएनपीटी बंदर येथून गुजरात, नाशिकच्या दिशेने होणारी अवजड वाहतूकही होते. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यात मेट्रो, रस्ते रुंदीकरण तसेच इतर प्रकल्पांमुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीवर मात करण्यासाठी पालिकेने शहराचा वाहतूक आराखडा तयार केला होता. मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. २०१० पासून या आराखड्याचे काम सुरू करण्यात आले. २०१८मध्ये त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यात, मेट्रो मार्गांचे आरेखन, ठाणे पूर्व येथील सॅटीस प्रकल्प, ठाणे-मुलुंड दरम्यानचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक, आनंद नगर ते साकेत कोस्टल रोड, भुयारी मार्ग अशा सूचना करण्यात आल्या होत्या. ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले होते. परंतु सहा वर्षांपुर्वी तयार करण्यात आलेला आराखडा आणि शहरातील सध्याची बदललेली वाहतूक स्थिती यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे मुंबई आयआयटीमार्फत ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे. या बैठकीस आयआयटी, मुंबईतील जीआयएसई हबचे प्रा. सुमीत सेन, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे आणि भगवान शिंदे उपस्थित होते.
हेही वाचा >>>डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
ठाणे शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याचा अभ्यास करणे, त्यात सुचवण्यात आलेल्या उपायांच्या अमलबजावणीचा आढावा घेणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक ते उपाय आणि सूचना करणे हा या फेरआखणीचा मुख्य उद्देश आहे. आयआयटी, मुंबईतील ‘जीआयएसई हब’मधील तज्ज्ञ आणि अभ्यासक हे उपलब्ध माहिती, नव्याने प्राप्त झालेल्या अत्याधुनिक मॉडेल्सच्या मदतीने ही फेरमांडणी करणार येणार आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने हा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी गठीत करण्यात येणाऱ्या अभ्यास गटात, वाहतूक पोलीस, मेट्रो, एमएमआरडीए, रेल्वे, पर्यावरण विषयक तज्ज्ञ यांचाही सहभाग घेण्यात येईल. तसेच या फेरआखणीचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी नागरिकांचा प्रतिसादही जाणून घेण्यात येणार आहे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
वाहतूक आराखड्यातील तरतूदी आणि सद्यस्थिती तसेच भविष्यातील आव्हाने यांचा अभ्यास करून आराखड्याची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. २०१८मधील या आराखड्याची फेरमांडणी करून २०३०पर्यंतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी, आयआयटी, मुंबईतील ‘जीआयएसई हब’ या विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची सांगड घालणाऱ्या तज्ज्ञ गटांच्या मदतीने पुढील वर्षभरात फेरआखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.