डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील आयरे गावात एका जमीन मालकाच्या सात बारा उताऱ्यावर मूळ भूक्षेत्र २१० चौरस मीटर असताना महसूल विभागाला अंधारात ठेऊन काही वारसांनी हे भूक्षेत्र ४०० चौरस मीटर दाखवून वाढीव भूक्षेत्राचे बनावट सात बारा उतारे तयार केले. या बनावट सातबारा उताऱ्याच्या आधारे, पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या, महारेराचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र, महसूल विभागाचा बिगरशेती परवाना या आधारे विकासकाच्या साहाय्याने काही वारसांनी सहा माळ्याच्या राघो हाईट्स नावाने बेकायदा इमारतीची उभारणी केली असल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे.
या बनावट दस्तऐवज प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून रामनगर पोलिसांनी तक्रारदार उज्जवला पाटील यांच्या तक्रारीवरून सुरेखा नाना पाटील, भीम राघो पाटील आणि मेसर्स मोरया इन्फ्राचे नितीन बाळानंंद नाईक (रा. मुंब्रा रेतीबंदर) यांच्या विरुध्द यापू्वीच गुन्हा दाखल केला आहे.
पालिकेच्या ग प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी मे २०२१ मध्ये राघो हाईटस इमारतीचे बांधकाम अनधिकृत घोषित केले आहे. या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून तक्रारदार उज्जवला पाटील यांनी पालिकेत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली. गायकवाड यांनी ग प्रभागाला याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.
महसूल विभागाने आयरे गावातील सर्वे नंबर ८० हिस्सा क्रमांंक २ वरील भूक्षेत्रात आम्ही बदल केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने राघो हाईट्सला नगररचना विभागाने बांधकाम परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर महारेराच्या संकेतस्थळावर राघो हाईट्सला महारेरा नोंदणी प्रमाणपत्र दिले नसल्याची नोंद तक्रारदार पाटील यांना आढळून आली आहे. या बेकायदा इमारतीत ३० सदनिका आणि नऊ व्यावसायिक गाळे आहेत.
या बेकायदा इमारतीमधील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदीदारांना विकून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने पालिकेकडे केली आहे. आयरेतील बेकायदा जमीनदोस्त झालेल्या साई रेसिडेन्सीचे प्रकरण उज्जवला पाटील यांनी उघडकीस आणले होते.
बनावट सातबारा उतारा
आयरे गावातील सर्वे क्रमांंक ८० हिस्सा क्रमांंक २ ची मिळकत तुकाराम राघो पाटील आणि इतर यांच्या मालकीची आहे. या सर्वे क्रमांकावरील जमिनीचे मूळ क्षेत्रफळ २१० चौरस मीटर आहे. या जमिनीवर इमारत बांधण्यासाठी जमीन मालक तुकाराम पाटील, सुरेखा पाटील, भीम राघो पाटील यांनी मे. मोरया इन्फ्राचे विकासक नितीन नाईक यांच्या बरोबर केलेल्या विकसन करार नाम्यात हे क्षेत्रफळ ४०० चौरस मीटर नमूद करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ६५ महारेरातील इमारतींवरील कार्यवाही सुरू आहे. याप्रकरणानंतर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे राघो हाईट्स इमारतीवरील कारवाईचा विचार नक्की करू. संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त. ग प्रभाग. राघो हाईट्स बेकायदा इमारत पाडण्यास पालिकेने टाळाटाळ केली तर आपण उच्च न्यायालयात जाऊन याप्रकरणी दाद मागणार आहोत. उज्जवला पाटील, तक्रारदार.