डोंबिवली – उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डोंंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील इमारती तोडण्याचे नियोजन कल्याण डोंबिवली पालिका, पोलिसांकडून सुरू आहे. या बेकायदा इमारतींवर न्यायालयाची टांगती तलवार असताना डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथे आर. के. बाझार दुकान, सर्वोदय आर्चिड इमारतीच्या पाठीमागील बाजूस भूमाफियांनी पालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये घाईघाईने एक बेकायदा इमारत उभारणीचे काम पूर्ण केले आहे. या बेकायदा इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून एकाचवेळी बांधकाम आणि त्याचवेळी त्या इमारतीला सफेद रंग लावून ही इमारत जुनी आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न भूमाफियांकडून केला जात आहे. डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठ भागातील आर. के. बाजार दुकानाच्या पाठीमागील भागातील रस्त्यावर, सर्वोदय आर्चिड गृहसंकुलाच्या लगत मागील भागात ही बेकायदा इमारत पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

या भागातून पालिकेचा विकास आराखड्यातील १८ मीटरचा रस्ता जातो. या रस्त्यामध्येच ही बेकायदा इमारत भूमाफियांकडून उभारली जात आहे. डोंबिवलीतील बेकायदा इमारती तोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पालिका, पोलीस आणि या इमारतींमधील रहिवासी हादरून गेले आहेत. अशा परिस्थितीत न्यायालय, पालिका या यंत्रणांना आव्हान देत भूमाफिया बेकायदा इमारतीची उभारणी करत असल्याने परिसरातील रहिवासी हैराण आहेत. या भूमाफियांना पालिका प्रशासनाचा धाक राहिला आहे की नाही, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. ही बेकायदा इमारत अधिकृत आहे असे घर खरेदीदारांना दाखवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका विक्री करण्याची प्रक्रिया भूमाफियांनी सुरू केली असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. या आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीत घर खरेदीदारांची फसवणूक होण्यापूर्वीच पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालावे आणि इमारत तात्काळ भुईसपाट होईल यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक आणि तक्रारदारांकडून केली जात आहे.

नांदिवली पंचानंद हा डोंबिवली शहरातील नागरीकरण होत असलेला महत्वाचा भाग आहे. या भागात आखीव रस्ते, बगिचे, उद्याने, मैदानांसाठीचे राखीव भूखंड भूमाफियांनी यापूर्वीच बेकायदा इमारती बांधून हडप केले आहेत. सर्वोदय आर्चिड इमारतीच्या पाठीमागील बाजुला आठ वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या आठ बेकायदा इमारती रखडलेल्या अवस्थेत आहेत. नांदिवली पंचानंद भागात सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणारा भूमाफिया रस्ते मार्गात बेकायदा इमारत उभारत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. डोंबिवली नांदिवली पंचानंद भागात अलीकडे एकाही नवीन बांधकामाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे संंबंधित इमारत बेकायदा आहे. या इमारतीची सर्वेअरमार्फत पाहणी करून कारवाईच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील.-देविदास जाधव, उपअभियंता, नगररचना विभाग.

ई प्रभाग हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम सुरू नाही. तरीही असे काही बांधकाम सुरू असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन त्यावर विहित प्रक्रिया पार पाडून त्या बेकायदा इमारतीवर तात्काळ कारवाई केली जाईल.- तुषार सोनावणे, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग.