दोन महिन्यापूर्वी नवीन आयुक्त आल्यानंतर बेकायदा बांधकामा विषयी काय भूमिका घेतात याकडे बेकायदा बांधकामे करणाऱ्या विकासकांच्या नजरा लागल्या होत्या. आता आयुक्त बेकायदा बांधकामांविषयी आक्रमक नसल्याची जाणीव झाल्याने डोंबिवली, कल्याण, टिटवाळा भागातील भूमाफियांनी आपली थांबविलेली बेकायदा बांधकामे पुन्हा नव्याने जोमाने सुरू केली आहेत. यामध्ये पालिकेच्या सुविधांसाठी आरक्षित भुखंडांचा समावेश आहे.प्रभागातील साहाय्यक आयुक्तांकडून अशा बांधकामांना कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा पाठविल्या जातात. त्यानंतर बांधकामधारकाशी संगनमत करुन साहाय्यक आयुक्त अशा बेकायदा बांधकामांना अभय देत असल्याच्या तक्रारी आहेत. आपल्या बेकायदा बांधकामांना कोणताही धोका नको म्हणून काही माफिया पालिका मुख्यालयातील काही विशिष्ट अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
हेही वाचा >>> बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात
प्रभागातील साहाय्यक आयुक्तांवर नियंत्रणासाठी नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या कालावधीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे गेल्या दोन वर्षाच्या उभी राहिली. बेकायदा बांधकामांना चोरुन वीज, पाणी घेतले जाते. वाहनतळाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत नसल्याने या इमारतीत रहिवासी राहण्यास आले की त्यांची सर्व वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे त्या रस्त्यावर पुन्हा वाहन कोंडी सुरू होते. अशा इमारतींना माफिया पालिका अधिकाऱ्यांशी संगमनत करुन चोरुन नळ जोडण्या घेतात. परिसरातील अधिकृत इमारतींना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्यास सुरुवात होते. नवीन समस्या ही बेकायदा बांधकामे निर्माण करत असताना प्रशासन या बेकायदा बांधकामांशी आक्रमक भूमिका घेण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पदभार स्वीकारताना शहरातील बेकायदा बांधकामे विषय गांभीर्याने घेतला जाईल असे सांगितले होते. आता पालिकेच्या परवानग्या न घेता, यापूर्वी रखडलेली सर्व बेकायदा बांधकामे नव्या जोमाने सुरू झाल्याने शहरात प्रशासन आहे की नाही असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. फ प्रभागात खंबाळपाडा, भोईरवाडी, ई प्रभागात २७ गाव नांदिवली, देसलेपाडा, ग प्रभागात सुनीलनगर, आयरे, कोपर पूर्व, मानपाडा रस्ता, ह प्रभागात भागात सर्वाधिक बेकायदा बांधकामे बांधली जात आहेत.
हेही वाचा >>> मधुकर पिचडांच्या सत्तेला २८ वर्षानंतर राष्ट्रवादीने लावला सुरुंग; अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत सत्तांतर
सुनीलनगरमध्ये कारवाई
डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर मधील गोपाळ बाग भागात बाळू भोईर या भूमाफियाने गेल्या वर्षभरात तीन माळ्याची आरसीसी पध्दतीची बेकायदा इमारत उभारली होती. पालिकेच्या ग प्रभागाने बाळू भोईर यांना वेळोवेळी बांधकामाची कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटिसा पाठविल्या होत्या. बांधकामधारक कागदपत्रे सादर करू न शकल्याने या इमारतीवर त्यावेळीच कारवाई होणे आवश्यक होते. परंतु, तत्कालीन एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात संगनमत करुन या बेकायदा इमारतीला अभय दिले. याविषयीचे ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे. त्यामुळे या इमारतीवर वर्षभरात कारवाई करण्यात आली नाही.
हेही वाचा >>> कल्याण मध्ये वित्त पुरवठादाराची औषध विक्रेत्यांकडून फसवणूक
डोंबिवली परिमंडळ उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी डोंबिवली विभागातील बेकायदा बांधकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांना सुनीलनगर मधील बाळू भोईर यांच्या इमारतीला नोटिसा देऊनही ती पाडली नसल्याचे निदर्शनास आले. उपायुक्त देशपांडे यांनी तातडीने ही इमारत भुईसपाट करण्याचे आदेश ग प्रभाग साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांना दिले. ही इमारत तोडू नये म्हणून मंत्रालायतील एका उच्चपदस्थाच्या दालनातून अधिकाऱ्यांना फोन येऊ लागले. उपायुक्त देशपांडे यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता शनिवारी साहाय्यक आयुक्त साबळे, अतिक्रमण नियंत्रण प्रमुख राजेंद्र साळुंखे, उपअभियंता शिरिष नाकवे, तोडकाम पथक, दोन जेसीबी, पोकलनेच्या साहाय्याने इमारत भुईसपाट केली. एका अधिकाऱ्याने आशीर्वाद दिलेली इमारत दुसऱ्या अधिकाऱ्याने जमीनदोस्त केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
ग प्रभाग हद्दीतील बेकायदा इमारतींची यादी तयार करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त मिळेल त्याप्रमाणे या इमारती आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, परिमंडळ उपायुक्त देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. – संजय साबळे , साहाय्यक आयुक्त , ग प्रभाग, डोंबिवली