लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागात माध्यमिक शाळेचे आरक्षण असलेल्या सहा हजार ६०० चौरस मीटरच्या भूखंडावर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीला महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून ही इमारत पालिकेच्या नगररचना विभागातून अधिकृत करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या आहेत, अशी तक्रार आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.
डोंबिवलीत महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून ६५ बेकायदा इमारतींची खासगी आणि पालिकेच्या आरक्षित सुविधा भूखंडांवर माफियांनी उभारणी केली आहे. या भूमाफियां विरूध्द पालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडीमध्ये पालिकेच्या आरक्षण क्रमांक २९० या माध्यमिक शाळेच्या आरक्षणावर सात माळ्याची बेकायदा इमारत उभारणारे जमीन मालक प्रदीप पंढरीनाथ ठाकूर, विकासक आर. एम. जी. तर्फे राजे रघुनंदन राम, वास्तुशिल्पकार जी. एन. गंधे यांचा समावेश आहे.
आणखी वाचा-दिवसाढवळ्या लोकशाही ची हत्या झाली; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महाविकास आघाडीची बॅनरबाजी
आपण ठाकुरवाडीत बांधलेली बेकायदा इमारत माध्यमिक शाळेच्या आरक्षित भूखंडावर आणि ६५ महारेरा प्रकरणात आपण आरोपी आहोत, हे माहिती असुनही जमीन मालक प्रदीप ठाकूर, वास्तुशिल्पकार जी. एन. गंधे यांनी नगररचना विभागात इमारतीला बांधकाम परवानगीचा अर्ज गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दाखल केला आहे. ही माहिती या भागातील रहिवासी धिरेंद्र भोईर यांना समजताच त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे तक्रार केली आहे.
महसूल विभागाच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी पालिकेला पत्र लिहून याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही महिन्यांपासून तक्रारदार धिरेंद्र भोईर प्रदीप ठाकूर यांची आरक्षणावरील बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची मागणी पालिकेकडे करत आहेत. पालिकेकडून आक्रमक कारवाई होत नसल्याने भोईर यांनी पालिकेसमोर उपोषण करण्याचा अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या सर्व प्रकरणाची कागदपत्रे ‘लोकसत्ता’कडे आहेत.
ठाकुरवाडीमध्येच अग्नि देवी मंदिराजवळ प्रकाश गोठे, शंकर ठाकूर या भूमाफियांनी गटारे, पदपथ तोडून बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. गटारांचे मार्ग बंद झाल्याने या भागात दुर्गंधी आणि जागोजागी पाणी तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. तक्रारदार संदीप हरिश्चंद्र पाटील यांनी भूमाफिया गोठे, ठाकूर यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्या इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी आयुक्त जाखड यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची कागदपत्रे ‘लोकसत्ता’कडे आहेत.
आणखी वाचा-हरिओमनगर, कोपरीतील रहिवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
ठाकुरवाडीतील प्रदीप ठाकूर यांनी वास्तुशिल्पकार गंधे यांच्यामार्फत इमारत बांधकाम परवानगीचा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावात अनेक त्रृटी आहेत. ही इमारत बेकायदा असल्याचे स्पष्ट झाल्यावर ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांना कारवाईसाठी कळविले जाईल. -शशिम केदार, नगररचनाकार, डोंबिवली.
ठाकुरवाडीतील बेकायदा, आरक्षणावरील इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. या इमारतींच्या बांधकामधारकांना तशा नोटिसा दिल्या आहेत. पोलीस बंदोबस्त मिळाल्या की या इमारती जमीनदोस्त करू. -स्नेहा करपे, साहाय्यक आयुक्त, ‘ह’ प्रभाग, डोंबिवली.