लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : येथील पूर्वेतील नांदिवली पंचानंद भागातील स्वामी समर्थ चौकात पालिकेच्या २४ मीटर रूंदीच्या विकास आराखड्यामधील रस्त्यात दहा वर्षापूर्वी उभारण्यात आलेली एक बेकायदा इमारत पालिकेच्या ई प्रभाग तोडकाम पथकाने मंगळवारी जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे मानपाडा रस्ता, स्टार कॉलनी, पी ॲन्डी टी कॉलनी, हनुमान मंदिर, बाह्यवळण रस्ता ते कोपर या विकास आराखड्यातील रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या विकास आराखड्यात मानपाडा छेद रस्त्यावरील स्टार कॉलनी, हनुमान मंदिर, समर्थ चौक, बाह्यवळण रस्ता ते कोपर हा २४ मीटरचा प्रस्तावित रस्ता आहे. या रस्त्याचे स्टार कॉलनी ते हनुमान मंदिरापर्यंतचे सीमेंट काँक्रिट रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले. या रस्त्यामध्ये मीलन सोसायटी ते समर्थ चौक दरम्यान विकास आराखड्यातील रस्त्यात दहा वर्षापूर्वी बांधलेली ओम रेसिडेन्सी इमारत आणि सहा व्यापारी गाळे होते. या इमारतीत रहिवास होता. या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून रखडले होते.
आणखी वाचा-माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
ई प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी विकास आराखड्यातील रस्त्याचे काम पूर्ण होणे आवश्यक असल्याने या रस्ते कामात अडथळा येणाऱ्या समर्थ चौकातील ओम रेसिडेन्सी इमारतीमधील १६ रहिवाशांना घरे आणि व्यापाऱ्यांना गाळे खाली करण्याच्या यापूर्वी नोटिसा दिल्या होत्या. दरम्यानच्या काळात पावसाळा सुरू झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पालिकेला रस्त्यामधील या बेकायदा बांधकामांवर कारवाई करता आली नव्हती. ओम रेसिडेन्सीमधील रहिवाशांनी स्वत:हून घरे रिकामी करून दिली होती. मंगळवारी सकाळी ई प्रभागाचे विद्यमान साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप आणि त्यांच्या पथकाने ही इमारत जमीनदोस्त केली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
समर्थ चौकातील अतिक्रमणे हटविल्याने मीलन सोसायटी ते समर्थ चौकातील काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करणे ठेकेदाराला शक्य होणार आहे. समर्थ चौक, स्वामी समर्थ मठ, बाह्यवळण रस्ता (टिटवाळा-शिळफाटा) ते कोपर पर्यंतचा विकास आराखड्यातील रस्त्यांची बांधणी करणे पालिकेला शक्य होणार आहे. या रस्त्यामुळे येत्या काळात मानपाडा रस्त्यावरून येणारा प्रवासी वाहनाने स्टार कॉलनी, समर्थ चौकातून बाह्यवळण रस्त्याने कोपर भागात, तसेच माणकोली उड्डाण पुलाच्या दिशेने जाऊ शकणार आहे. कोपर, माणकोली पुलाकडील वाहने समर्थ चौकातून मानपाडा रस्ता किंवा शिळफाटाकडे जाऊ शकतील.
आणखी वाचा-ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
नांदिवलीत समर्थ चौकात विकास आराखड्यातील २४ मीटर रस्त्यात ओम रेसिडेन्सी ही बेकायदा इमारत उभारण्यात आली होती. या इमारतीलगत सहा गाळे होते. त्यामुळे काँक्रीट रस्त्याचे काम रखडले होते. ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. -चंद्रकांत जगताप, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग, डोंबिवली.