डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्या लगतच्या २७ गावातील सोनारपाडा गावातील अतिशय अडचणीच्या ठिकाणी उभारण्यात आलेली महारेरा गुन्ह्यातील एक बेकायदा इमारत ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार आणि त्यांच्या पथकाने गेल्या महिनाभर अथक मेहनत घेऊन शक्तिमान कापकाम यंत्र, जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनारपाडा मधील भूमाफिया किशोर म्हात्रे यांनी ही पाच माळ्याची इमारत पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता, या इमारतीला पोहच रस्ता उपलब्ध नसताना उभारली होती. या बेकायदा इमारतीला माफिया किशोर म्हात्रे यांनी महारेराचे नोंदणी क्रमांंक मिळवून या इमारती मधील सदनिका ग्राहकांना विकण्याची तयारी केली होती. एल आकाराच्या असलेल्या या बेकायदा इमारतीच्या एका बाजुने उच्च दाबाच्या वीज वाहिन्या गेल्या होत्या. त्यामुळे ही इमारत तोडणे मोठे आव्हान ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त पवार यांच्या समोर होते.

हेही वाचा… कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

गेल्या महिन्यापासून ही बेकायदा इमारत कामगारांच्या साहाय्याने, नंतर जेसीबी आणि त्यानंतर शक्तिमान कापकाम यंत्र यांचा वापर करून तोडण्यास सुरूवात केली होती. सोमवारी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या इमारती लगतच्या काही इमारतींना धोका असल्याने तेथील रहिवाशांंना काही दिवस बाजुला राहण्यास सांगण्यात आले होते. या इमारतीचा पाडकाम खर्च माफियांकडून वसूल केला जाणार आहे.

ज्या भूमाफियांनी पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बेकायदा इमारती उभारल्या आहेत. अशा इमारतींना माफियांनी महारेराचे नोंंदणी प्रमाणपत्र मिळविले आहे. अशा इमारती भुईसपाट करण्याची करावी असे आदेश वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली पालिकेला दिले आहेत. याप्रकरणी रामनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात ६५ बेकायदा इमारतीशी सुमारे ३५० जणांवर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा… ‘शिक्षण हक्क’च्या नावाने फसवणूक! ‘आरटीई’च्या नव्या नियमावलीविरोधात पालक आक्रमक

न्यायालयाच्या आदेशावरून आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशावरून महारेरा गुन्ह्यातील इमारती भुईसपाट करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. साहाय्यक आयुक्त ही कामगिरी पार पाडत आहेत. आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी किशोर म्हात्रे यांची इमारत जमीनदोस्त केली. डोंबिवलीतील शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमी जवळील महारेरा गुन्ह्यातील एक बेकायदा इमारत ग प्रभागाने पावसाळ्यापूर्वी जमीनदोस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.

पाच इमारती रडारवर

सोनारपाडा येथे महारेरा गुन्ह्यातील आणखी पाच इमारती बांधून सज्ज आहेत. या इमारती पालिकेच्या रडारवर आहेत. यामध्ये देवेंद्र म्हात्रे, शांताराम जाधव आणि मे. विनायक कन्स्ट्रक्शची इमारत, महेश शर्मा, सामी असोसिएशट, अमृता दीपक घई, मे. विनायक बिल्डर्स, शेवंंताबाई पाटील, शांताराम जाधव, देवेंद्र जाधव, पूनम पाटील, जडवतीदेवी यादव.

२७ गाव ई प्रभागातील महारेरा गुन्ह्यातील सर्व बेकायदा इमारती तोडण्याचे नियोजन केले आहे. सोनारपाड्यातील उर्वरित बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. न्यायालय आणि आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई केली जात आहे. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त,
ई प्रभाग, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal building registered in maharera crime case demolished by kdmc in sonarpada dombivli asj