डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेला कोपर भागात स्मशानभूमीकडे जाण्याच्या रस्त्यावर पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता भूमाफियाने भर रस्त्यात ‘विठाई हेरिटेज’ या बेकायदा इमारतीचे बांधकाम केले आहे. या इमारतीच्या चारही बाजुने वाहन जाण्यासाठीही जागा ठेवण्यात आलेली नाही. अशा इमारतीत काही दुर्घटना घडली तर अग्निशमन दल, रुग्णवाहिका कशी जाणार, असे प्रश्न या भागातील रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.
या इमारती मधील सदनिका भूमाफियांनी विक्रीसाठी सज्ज ठेवल्या आहेत. बनावट कागदपत्र दाखवून घर खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काही जागरुक नागरिकांनी याप्रकरणी पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण आयुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त यांना या बेकायदा बांधकामाच्या ठिकाणी या इमारतीला पालिकेची परवानगी नाही. याठिकाणी नागरिकांनी सदनिका खरेदी करू नये, असा फलक लावण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा >>> दीपोत्सवानिमित्त डोंबिवलीत एक हजार लीटर खाद्यतेल जमा करण्याचा संकल्प
सुमारे ६० हून अधिक सदनिका या बेकायदा इमारतीत आहेत. एवढी टोलेजंग बेकायदा इमारत कोपर भागातील कोपर चौकातील स्मशानभूमीकडे जाण्याच्या रस्त्यावर उभी राहिली तरी पालिका नगररचना, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण आयुक्तांच्या ही इमारत का निदर्शनास आली नाही, असे प्रश्न तक्रारदाराने उपस्थित केले आहेत. डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारतींच्या प्रकरणाची पोलिसांच्या विशेष तपास पथकातर्फे चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनेक नागरिकांची फसवणूक झाली आहे. अशाच प्रकारे कोपर येथील विठाई हेरिटेज बेकायदा इमारतीच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी पालिकेने काळजी घेण्याचे आवाहन तक्रारदाराने केले आहे.
या इमारतीच्या दर्शनी भागाचा सज्जाचा भाग रस्त्यावर आला आहे. रस्ता पदपथाची जागा इमारतीसाठी वापरण्यात आली नाही. शून्य सामासिक अंतर ठेऊन (झीरो मार्जिन) ही इमारत उभारण्यात आली आहे, असे तक्रारदाराने सांगितले. या इमारती संदर्भात पालिका नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता, कोपर भागात अशाप्रकारच्या इमारतीला नगररचना विभागाने परवानगी दिलेली नाही. या इमारतीला चारही बाजुने सामासिक अंतर नाही. ही इमारत बेकायदा आहे असे सांगितले. विठाई हेरिटेज इमारती संदर्भात पालिकेची भूमिका समजून घेण्यासाठी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. डोंबिवलीतील बेकायदा इमारत प्रकरणात विशेष पोलीस तपास पथक, सक्तवसुली संचालनालयाकडून तपास सुरू असताना सुध्दा भूमाफिया धाडसाने बेकायदा इमारतींमधील सदनिका धडाधड विक्रीसाठी प्रयत्नशील असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या इमारती मधील सदनिका सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांपासून पुढे विकण्याच्या माफियांच्या हालचाली आहेत असे सुत्राने सांगितले.