लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: कल्याण पूर्व भागातील बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडिवली-ढोकळी, नेवाळी भागातील बेकायदा इमारती, चाळी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या. नेवाळी भागात शेत जमिनीमध्ये जमीन अकृषिक न करता बांधकामे करण्यात आली आहेत. आडिवली ढोकळी भागात एक हजाराहून अधिक बेकायदा चाळी, इमारती मागील आठ वर्षात भूमाफियांनी उभारल्या आहेत. या बांधकामांमुळे या भागातील विकास आराखड्यातील रस्ते, गल्ली बोळ, सांडपाणी वाहून नेण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

अशा सर्व बेकायदा बांधकामांची यादी करुन अशी अनधिकृत बांधकामे आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त सुधाकर जगताप, उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमीनदोस्त करण्याची कारवाई गेल्या वर्षापासून सुरू केली आहे. याच कारवाईचा भाग म्हणून आडिवली ढोकळी भागातील भूमाफिया सुनील मेवाती यांनी पालिकेच्या परवानग्या न घेता उभारलेली चार माळ्याची बेकायदा इमारत जमीनदोस्त केली.

आणखी वाचा-डोंबिवलीत बेशिस्त ६२ रिक्षाचालकांवर कारवाई, एक लाख ९३ हजारांचा दंड वसूल

मलंग रस्त्यावरील नेवाळी नाका, आडिवली ढोकळी भागात माळरानावर उभारण्यात आलेल्या सहा चाळी, नवीन बांधकामासाठीचे जोते जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. आय प्रभागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी अडून राहील, नैसर्गिक प्रवाह बंद करुन चाळी, इमारतींची बांधकामे भूमाफियांनी केली आहेत. अशी बांधकामे प्राधान्याने तोडून टाकण्यात येत आहेत. याशिवाय पावसाळ्यात कोठेही वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून मुख्य वर्दळीच्या मार्गावरील टपऱ्या, निवारे तोडून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले.

“पावसाळ्यात पावसाचे पाणी अडून राहील अशा पध्दतीने आडिवली, ढोकळी, नेवाळी भागात काही ठिकाणी बेकायदा बांधकामे केली आहेत. अशी इमारत, चाळींची बांधकामे प्राधान्याने भुईसपाट केली जात आहेत. नेवाळी भागातील माळरानावरील बांधकामे तोडून टाकण्यात येत आहेत.” -हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal buildings demolished in newali and adivli in kalyan east mrj