लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : सार्वजनिक रस्त्याला अडथळा ठरणारा, कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता उभारलेला गोळवली गावातील तुळशीराम काळण यांच्या मालकीचा बंगला आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने बुधवारी भुईसपाट केला.

गोळवली गावातील सार्वजनिक रस्त्याला अडथळा होईल. गावातील विकास नियोजनाला अडथळा येईल, अशा पध्दतीने तुळशीराम काळण यांनी पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बेकायदा बंगला बांधला होता. या बेकायदा बांधकामा विषयी पालिकेच्या आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या.

आणखी वाचा-आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी, तळोजा तुरूंगात रवानगी

या बंगल्याच्या परिसरात गर्दुल्ले, मद्यपी यांचा वावर होतात. दहशतीच्या वातावरणामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेत या भागातून जाणे शक्य होत नव्हते. शाळकरी मुले त्रस्त होती. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी बंगले मालक काळण यांना जमीन हक्क, बांधकाम परवानगीचे कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. विहित मुदतीत काळण कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. गोळवली भागात बेकायदा बांधकामे तोडले तर या भागात भूमाफिया अधिकाऱ्यां विरूध्द उठाव करतात असे वातावरण असते.

मुंबरकर यांनी मानपाडा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने मंगळवारी सकाळी काळण यांचा बंगला तोडण्यास सुरूवात केली. त्यावेळी या भागात तणावाचे वातावरण होते. परंतु, पोलिसांनी त्या परिसरातून नागरिकांना पिटाळून लावले. त्यामुळे दुपारपर्यंत बंगला जमीनदोस्त करण्याची कारवाई तोडकाम पथकाने पार पाडली. मानपाडा पोलिसांचे या कामी महत्वाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे कोणीही नागरिकाने याठिकाणी दहशत पसरवून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला नाही, असे मुंबरकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-डोंबिवली : वर्दळीच्या फडके रोडवर दोन रांगांमध्ये दुचाकींचे बेकायदा वाहनतळ

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी एकूण सात बेकायदा इमारती भुईसपाट केल्या आहेत. याशिवाय १०० हून अधिक चाळी, व्यापारी गोळे तोडले आहेत. या सततच्या कारवाईमुळे आय प्रभाग हद्दीत बेकायदा बांधकामांचे प्रमाण कमी झाले आहे.

ज्या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी आहेत. नवीन बेकायदा बांधकामे निदर्शनास येत आहेत. ती तोडली जात आहेत. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशाप्रमाणे प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही असे नियोजन केले आहे. -हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.