लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : येथील तलावपाळी परिसरातील एका इमारतीत स्पा पार्लरच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी इमारतीमधील रहिवाशांकडून प्राप्त होताच, शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी स्पा पार्लरवर धाड टाकून पाहाणी केली. अवैध धंदे होत असलेले हे स्पा पार्लर ४८ तासात बंद करा नाहीतर शिवसेना पद्धतीने बंद करू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी पार्लर मालकाला यावेळी दिला.
ठाणे येथील तलावपाळी परिसरातील एका इमारतीत स्पा पार्लर सुरू आहे. या इमारतीमधील रहिवाशांनी या स्पा पार्लरबाबत शिवसेना (शिंदे गट) ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेत तक्रार दाखल दिली होती. स्पा पार्लरच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असून येथे चुकीची लोक येतात. यामुळे इमारतीमधील महिलांना सुरक्षित वाटत नाही, अशा स्वरुपाची ही तक्रार होती. या तक्रारीनंतर नौपाडा विभागाचे विभागप्रमुख किरण नाक्ती यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी दुपारी थेट स्पा पार्लरमध्ये धाड टाकत संपुर्ण पार्लरची पाहाणी केली. त्याठिकाणी छोट्या-छोट्या खोल्या तयार करण्यात आल्याचे तसेच पुर्णपणे येथे अंधार असल्याचे त्यांना दिसून आले.
तसेच येथील कर्मचाऱ्यांना मालकाबाबत विचारणा केली. मात्र, मालक तिथे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी मालकाला फोन करून पार्लरमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत विचारणा केली. तसेच इमारतीमधील रहिवाशांनी ना हरकत दाखला दिलेला नसतानाही पार्लर कसे चालविता अशी विचारणा केली. त्यावर रहिवाशांनी ना हरकत दाखला दिला असल्याचा दावा मालकाने केला. परंतु रहिवाशांनी असा कोणताही दाखला दिला नसून त्यांचीच तक्रार असल्याचे नाक्ती यांनी सांगताच मालक निरुत्तर झाला. यानंतर स्पा पार्लर ४८ तासात बंद करा नाहीतर, आम्ही शिवसेना पद्धतीने तो बंद करू, असा इशारा नाक्ती यांनी दिला.
या प्रकरणाबाबत किरण नाक्ती यांनी सांगितले, शिवसेना (शिंदे गट) ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये तलावपाळी भागातील एका इमारतीमधील रहिवाशांनी तक्रार नोंदविली होती. इथे ज्या पद्धतीने अवैध धंदे चालतात, त्यामुळे येथील महिलांना सुरक्षित वाटत नाही. चुकीची लोक इथे येतात आणि ज्या पद्धतीचे धंदे केले जातात. परंतु ते बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. कारण हे पार्लर दुसऱ्या माळ्यावर आहे आणि त्या खालच्या मजल्यावर सर्व व्यावसायिक वापर सुरू आहे. महिलांना इथे चालणे आणि वावरण सुद्धा मुश्किल झालेले आहे. त्यामुळे येथे पाहाणी केली. शिवसेनेच्या शाखेत जेव्हा कुठलाही गरजू किंवा संकटात अडकलेला व्यक्ती येतो, तेव्हा धर्मवीर आनंद दिघे यांनी जी शिकवणीनुसार आम्ही मदतीसाठी पुढे येतो.
या स्पा पार्लरवर यापुर्वी धाड पडली होती. यानंतरही तो कसा सुरू झाला, याचाही आम्ही शोध घेणार आहोत. ४८ तासात बंद करा नाहीतर, आम्ही शिवसेना पद्धतीने तो बंद करू, असा इशारा मालकाला दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराची विकासाच्या दिशेला वाटचाल सुरू असून राज्यातील वारकऱ्यांनी ठाण्यात येऊन त्यांचा सन्मानही केला. त्या वारकऱ्यांच्या या पंढरीमध्ये आमच्यासारखा शिवसैनिक असले अवैध धंदे चालू देणार नाही आणि जिथे आम्हाला दिसेल तिथे आम्ही आता बंद करणार आहोत. असे नाक्ती म्हणाले. महापालिकेला सुद्धा तातडीने सांगणार आहे की कारवाई झाली पाहिजे आणि पोलीस स्टेशनची नंतर पुढची जबाबदारी असेल की हा असा प्रकार चालणार नाही, असेही ते म्हणाले.