लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: कल्याण पूर्व भागातील आय प्रभागातील वसार, माणेरे गावात सरकारी, खासगी जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी भूमाफियांकडून उभारण्यात येत होत्या. या सर्व नव्याने उभारण्यात येत असलेल्या चाळी, जोत्यांची बांधकामे आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जमीनदोस्त केली.

आय प्रभागात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा बांधकामांच्या विरुध्द आक्रमक कारवाई सुरू असल्याने परिसरातील अधिकृत इमारतीत राहणारे रहिवासी, पालिकेचे करदाते समाधान व्यक्त करत आहेत. बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची वाट न पाहता आवश्यक पालिकेतील पोलीस बळ, तोडकाम पथक घेऊन आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त मुंबरकर बेकायदा बांधकामांवर कारवाई करत आहेत.

आणखी वाचा- कल्याण पूर्वेत काटेमानिवलीत ब्रेक निकामी झाल्याने टँकरची रस्ता दुभाजकाला धडक

वसार, माणेरे भागात सरकारी, खासगी, गुरचरण जमिनींवर मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी, गाळे बांधण्याची कामे रात्रीच्या वेळेत केली जातात, अशी माहिती साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्याकडे आली होती. या माहितीची खात्री केल्यावर ती खरी ठरली. वसार, माणेरे भागातील बेकायदा चाळींची माहिती घेऊन तोडकाम पथक, जेसीबीच्या साहाय्याने बेकायदा चाळी, चाळींची बांधकामे उभारण्यासाठी माफियांनी २० हून अधिक जोत्यांची बांधकामे केली होती. ही सर्व बांधकामे तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली.

आय, अ, ह प्रभागात मोठया प्रमाणात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू असताना डोंबिवलीतील ग प्रभागातील अधिकारी, परिमंडळ उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त आयरे गाव हरितपट्ट्यातील १४ बेकायदा इमारती, बेकायदा चाळी तोडण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून पुढाकार घेत नसल्याने आयरे गाव भागातील रहिवासी, पर्यावरणप्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ही बांधकामे पोलीस बंदोबस्त मिळाली की तोडली जाणार आहेत. भूमाफियांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत, असे साचेबध्द उत्तर ग प्रभागाचे अधिकारी देतात, असे आयरे भागातील रहिवाशांनी सांगितले. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ग प्रभागात बेकायदा बांधकामांवर कारवाई का होत नाही. याची माहिती घेऊन संबंधितांना आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.

आणखी वाचा- डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची घामाघामू थांबली, फलाट क्रमांक पाचवर पाच पंख्यांची तजविज

गेल्या महिन्यात आयरे गाव ग प्रभागात हरितपट्टा किती क्षेत्रफळावर आहे. या भागातील विकास आराखड्यातील रस्ते कोणत्या भागातून गेले आहेत याची माहिती नगररचना विभागातील भूमापक संजय पोखरकर यांनी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांना दिली आहे.

ग प्रभागातील १४ बेकायदा इमारती आणि चाळींमध्ये काही निवृत्त पालिका अधिकारी, पालिका कर्मचारी यांचे हितसंबंध असल्यामुळे या बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्याची चर्चा आयरेगाव भागात आहे. आयरे गावातील बेकायदा बांधकामांवर कारवाई झाली नाहीतर आपण आयुक्त डॉ. दांगडे यांच्याकडे तक्रार करणार आहोत, असे या भागातील रहिवासी अंकुश केणे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त सुधाकर जगताप, परिमंडळ उपायुक्त स्वाती देशपांडे यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal chawl collapse in manere village vasar kalyan east mrj
Show comments