डोंबिवली परिसरातील रहिवाशांना ठाणे, नाशिक महामार्गाकडे जाताना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या वाहतूक कोंडीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उड्डाण पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या प्रशासकीय मंजुरीची अडथळ्यांची शर्यत देखील जलदगतीने पार करण्यात आली आहे. पण हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठीच्या विविध आव्हानांचा येत्या काळात प्रशासन कसा पाठपुरावा करणार हाच मुख्य मुद्दा आहे.

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर ते भिवंडी बाजूकडील माणकोली, पिंपळास दिशेने उल्हास खाडीवर १२७५ मीटर लांबीच्या उड्डाण पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ‘मेसर्स सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला कामाचा ठेका दिला आहे. १८५ कोटी रुपये या कामासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. तीन वर्षांत (३६ महिने) ठेकेदाराला हे काम पूर्ण करायचे आहे. या पुलामुळे डोंबिवली ते ठाणे हे अंतर अवघ्या २० ते २५ मिनिटांमध्ये कापणे शक्य होणार आहे. सध्या डोंबिवली परिसरातील रहिवाशांना ठाणे, मुंबई, नाशिक महामार्ग दिशेने जाताना गर्दीचा शिळफाटा रस्ता किंवा कल्याणमधील शिवाजी चौकातील कोंडीचा सामना करावा लागतो. माणकोली उड्डाण पुलामुळे त्यांचा तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डोंबिवली पश्चिमेत दुचाकी, चारचाकी, अवजड सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ वाढणार आहे. पुलाचे काम ‘एमएमआरडीए’च्या नियंत्रणाखाली होणार असल्याने निधीची कमतरता नाही. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होईल, यात संशय घेण्यास वाव नाही. यानिमित्ताने सी लिंक पद्धतीचा पूल प्रथमच ठाणे जिल्ह्य़ात होत आहे. या पुलामुळे अंतर कमी असूनही दूर असणारी डोंबिवली आणि ठाणे ही दोन महानगरे एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. या पुलामुळे डोंबिवलीच्या समाजजीवनात आमूलाग्र बदल होतील, पण त्याचबरोबर काही संभाव्य धोक्यांचा विचार करावा लागणार आहे.
सुविधांच्या जागा अडविल्या
पूल होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी भूमाफियांनी आधीच पुलाच्या आसपासच्या मोक्याच्या जागा अडविल्याने या परिसरातील सारे नियोजनाचे आराखडे सपशेल फसण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडीकिनारी भूमाफियांनी चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये पडद्यामागून राजकीय मंडळींचा सहभाग असल्याने पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करताना अडचणी येत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांनी चाळी तोडल्या तरी त्या पुन्हा रात्रीतून उभ्या करण्याचा अगोचरपणा भूमाफियांकडून सुरू आहे. चाळी तोडण्याची कारवाई केली, की पडद्यामागून राजकीय मंडळी अधिकाऱ्यांवर रोष धरत असल्याने अधिकारी अशा बांधकामांकडे मग नाइलाजाने दुर्लक्ष करतात. रेतीबंदर, मोठागाव खाडी किनारी सी.आर.झेड क्षेत्रात, सरकारी जमिनींवर राजरोसपणे बेकायदा चाळी उभारण्याचे काम सुरू असल्याने, येणाऱ्या काळात माणकोली उड्डाण पुलाला ही बांधकामे मोठा अडथळा ठरु शकतात. पूल होणार असल्याने वाहनांची वर्दळ वाढणार आहे. पुलाच्या रेतीबंदर बाजूला एखादे वाहनतळ, पेट्रोलपंप असेल तर वाहन चालकांना ते अधिक फायदेशीर असणार आहे. डोंबिवली पश्चिमेत एकही पेट्रोलपंप नाही. अशा सरकारी, राखीव पडीक जागा येणाऱ्या काळात वाहनतळ, पेट्रोलपंप, सीएनजी पंपसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी खूप मोलाच्या आहेत. अशा मोक्याच्या जागा जर भूमाफियांनी गिळंकृत केल्या तर सार्वजनिक सुविधा द्यायच्या कुठून, असा मोठा प्रश्न येत्या काळात निर्माण होणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे रोखणे आवश्यक आहे.
वाहतुकीचा ताण
माणकोली उड्डाण पुलाचे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे असल्याने हे काम साधारणपणे फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. तोपर्यंत डोंबिवलीतून पुलाच्या दिशेने येणारे पंडित दीनदयाळ रस्त्यासारखे मोठे, आनंदनगर भागातील गल्लीबोळातील पोहच रस्ते अतिक्रमणमुक्त आणि रुंदीकरण करण्यात आले पाहिजेत. येणारा तीन वर्षांचा काळ पाहता पालिकेने, वाहतूक पोलीस अधिकारी, पोलीस, वाहतूक तज्ज्ञ यांच्या पुढाकाराने डोंबिवली पश्चिमेतील महत्त्वाच्या रस्त्यांचे नियोजन, कोणते रस्ते एकेरी, दुहेरी वाहतुकीसाठी खुले ठेवायचे, कोपर उड्डाण पुलावरील वाहनांचा भार वाढणार असल्याने त्यासाठी कोणती पर्यायी यंत्रणा उभी करायची, डोंबिवली पूर्व, पश्चिमेतून, २७ गावे, एमआयडीसी भागातून येणारा वाहनचालक माणकोली उड्डाण पुलाच्या दिशेने जाताना कोणकोणत्या रस्त्याने जाऊ शकेल, याचे सर्वेक्षण करून त्याप्रमाणे आतापासून या वाहतुकीचे नियोजन केले तरच, डोंबिवलीतून माणकोली पुलाच्या दिशेने वाहने सहीसलामत जाऊ शकतील. सध्या डोंबिवली पश्चिमेतील कोपर उड्डाण पूल, दीनदयाळ चौक, विष्णुनगर पोलीस स्थानक, फुले चौक भागातील रिक्षा वाहनतळ, खासगी वाहने, पादचाऱ्यांची वर्दळ पाहता हा रस्ता गजबजून गेलेला असतो. वाहने दसपटीने वाढली आहेत. त्या प्रमाणात नवीन रस्ते किंवा रस्त्यांचे वेळीच रुंदीकरण न केल्याचे त्याचे चटके आता शहरवासीयांना बसत आहेत. दहा वर्षांनंतर प्रथमच पालिकेने शहरातील रस्तारुंदीकरणांची कामे हाती घेतली आहेत. ही कामे दर तीन वर्षांंनी पूर्ण केली असती तर, आता जे आकुंचन पावलेले रस्ते आणि त्यात एकमेकाला घासत, रेटत पुढे जाणारी वाहने असे विदारक दृश्य शहरात दिसते, ते कित्येक प्रमाणात कमी झाले असते.
कोणत्याही प्रशासन व्यवस्थेची अभियांत्रिकी फळी मेणचट असेल तर त्या शहराची, व्यवस्थेची कशी वाट लागते, याचे कल्याण डोंबिवली पालिका हे उत्तम उदाहरण आहे. पाटय़ाटाकू शिक्षण, दडपशाही वृत्ती आणि फक्त व्यवस्थेतील मानाची पदे मिळविण्यात माहीर अशीच अभियांत्रिकी फळी वर्षांनुवर्ष पालिकेत सर्वोच्च स्थानी राहिली. सर्वच आयुक्त, पदाधिकाऱ्यांनी असे ‘बस्तानठोके, हडपे अधिकारी’ आपल्या अवतीभोवती बाळगण्यात धन्यता मानली. विद्यमान आयुक्त ई. रवींद्रन तरी अशा अधिकाऱ्यांना बाजूला सारतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती, तीही फोल ठरली. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, माणकोली उड्डाण पुलाचा विचार करता, डोंबिवली पश्चिमेतील पंडित दीनदयाळ रस्ता, महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, गणेशनगरमधील रस्ते, विजयनगर सोसायटीतून देवीचापाडा, उमेशनगरकडे येणारे सर्व रस्ते यांचे वेळीच रुंदीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. डोंबिवली पूर्व भागातील केळकर रस्ता, टंडन रस्ता, कोपर उड्डाण पुलाजवळच्या अडचणी दूर होणे आवश्यक आहे. कोपर उड्डाण पुलावरून पश्चिमेत उतरल्यानंतर फक्त दीनदयाळ रस्ता हा एकमेव रस्ता न ठेवता, शास्त्रीनगर, सखारामनगर कॉम्प्लेक्स ते रेतीबंदर असा आणखी एक पर्यायी रस्ता माणकोली उड्डाण पुलाच्या दिशेने पोहच रस्ता म्हणून उपलब्ध करून देता येऊ शकेल का, या सर्व शक्यता पालिका, वाहतूक अधिकाऱ्यांनी तपासून पाहिल्या पाहिजेत. पश्चिमेत रेतीबंदर चौक रेल्वे फाटकातून पुलाकडे जाताना रेल्वे मार्ग ओलांडावा लागणार आहे. त्यामुळे या भागात प्राधान्याने भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाचा विचार करावा लागणार आहे. ती शक्यता आताच तपासून पाहणे आवश्यक आहे. ठाण्याकडून येणाऱ्या, डोंबिवलीतून पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना रेतीबंदर रेल्वे फाटकात ये जा करण्यासाठी पर्यायी कोणतेही साधन उपलब्ध करून दिले नाही, तर वाहतूक कोंडीचा हा एक नवीन अड्डा रेल्वे फाटकाजवळ तयार होईल. मग, ही वाहतूक कोंडी दीनदयाळ रस्ता, उमेशनगर परिसराला कवेत घेईल. खाडीच्या पलीकडे म्हणजे पिंपळास, माणकोली भागातून पुलाला नाशिक महामार्गाच्या दिशेने एक ते दीड किलोमीटरचा पोहच रस्ता तयार करण्यात येणार आहे. या भागात काही ग्रामस्थांनी प्रस्तावित रस्त्याचा अंदाज घेऊन जागा अडविण्यासाठी टपऱ्या, लाकडाचे खुटले टाकण्याची नामी शक्कल लढवली आहे. नाशिक महामार्गालगतचा भिवंडीलगतचा भाग गोदामांसाठी (कु)प्रसिद्ध आहे. या गोदामांच्या दगडी, विटा पुलाच्या पोहच रस्त्याच्या मार्गाकडे सरकणार नाहीत ना, याची काळजी नियंत्रक संस्थेला घ्यावी लागणार आहे.

 

Story img Loader