कल्याण – कल्याण पूर्वेतील मलंग रस्ता भागातील व्दारली, दावडी गाव हद्दीत मूळ नागरी वस्तीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभारण्यात आलेल्या १० बेकायदा चाळी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या. दावडी, व्दारली या मलंग रस्त्यावरील भागात भूमाफियांनी १० हून अधिक बेकायदा चाळी उभारल्या होत्या. या चाळींमध्ये गोदामे, इमारत बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली होती. या बेकायदा चाळी रस्ते, गटार, नैसर्गिक स्त्रोतांना अडथळा होत्या.
हेही वाचा >>> कल्याणमधील धक्कादायक प्रकार; गर्भपात होण्यासाठी सासुने मारल्या सुनेच्या पोटावर लाथा
या बेकायदा चाळींच्या अनेक तक्रारी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या. या चाळींची प्रत्यक्ष पाहणी करून या चाळी बेकायदा असल्याची खात्री झाल्यावर साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी, तोडकाम पथकाच्या साहाय्याने दोन दिवसापूर्वी या भागातील १० चाळी भुईसपाट केल्या.
या कारवाईपूर्वी काही राजकीय मंडळी, स्थानिकांनी कारवाईत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी दाद दिली नाही. या कारवाईमुळे भूमाफियांना मोठा दणका बसला आहे. बेकायदा चाळीत नुकसान झालेले व्यावसायिक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात खोट्या तक्रारी करून अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आय प्रभागात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू असल्याने भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक भूमाफियांंनी मुंबरकर यांच्या आक्रमक कारवाईमुळे त्यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या असल्याचे समजते. आपण आपले काम करत राहणार आहोत. त्यामुळे कोणी कितीही तक्रारी केल्या तरी आपली बेकायदा चाळी, इमारती तोडण्याची मोहीम थांबणार नाही, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले.