अंबरनाथमधील चिखलोली धरणासोबतच रेल्वेच्या जीआयपी धरणाच्या क्षेत्रात रासायनिक कचरा सापडल्यानंतर आता अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या वेशीवर बेकायदा कंपन्या सुरू असल्याचे समोर आले आहे.  प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी धरणक्षेत्रातील कचऱ्याप्रकरणी केलेल्या पाहणीतून हे धक्कादायक वास्तव उघड झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यात चिखलोली धरणाच्या मागच्या बाजूस कंपन्या रासायनिक कचरा टाकत असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीला लागूनच असलेल्या रेल्वेच्या जीआयपी धरण परिसरातही रासायनिक कचरा टाकल जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने मंगळवारी प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील, अंबरनाथ अतिरिक्त एमआयडीसीचे अभियंते आणि अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या (आमा) पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांना २० ते २५ रासायनिक कचरासदृश गोण्या आढळल्या. तसेच एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या जमिनीवर अशा प्रकारे इतर कचराही टाकला जात असल्याचे यावेळी समोर आले. त्याचवेळी तपासणी करत असताना अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या वेशीला लागूनच असलेल्या जीआयपी धरणाच्या किनारी काही कंपन्या बेकायदेशिररीत्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या कंपन्यांतून निघणारे रसायन जमिनीत शोषखड्डय़ाच्या माध्यमातून जिरवले जात असल्याचे यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तसेच काही कंपन्या रंगरंगोटीसाठी लागणारी प्रक्रिया करण्याचे कामही धरणाच्या क्षेत्रात करत असल्याचे समोर आले. त्याचा कचराही थेट धरणाच्या पाण्यात सोडला जात असल्याचे यावेळी दिसत होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथील पाण्याचे, कंपन्यांच्या शोषखड्डय़ात जमा केलेल्या रसायनाचे आणि मातीचे काही नमुने तपासणीसाठी सोबत घेतले आहेत.

याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकाशी संवाद साधला असता ही जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे त्यांनी सांगितले.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही कंपनी आमच्या नोंदीत नसल्याचे सांगितले. या अनधिकृत कंपन्या त्यांचे रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खड्डय़ात सोडत असल्याचे दिसून येते, असे घटनास्थळी उपस्थित प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी तातडीची बैठक

‘लोकसत्ता’तील वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीने संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क साधून एमआयडीसीतील या हरित पट्टय़ावर वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला. येत्या सोमवारी यासंबंधी बैठकीचे आयोजन करून हरित पट्टा टिकवणे, त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे, औद्योगिक वसाहतीतून बाहेर टाकल्या जाणाऱ्या साध्या कचऱ्याला जागा करून देणे, घातक रासायनिक कचरा बाहेर टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करणे अशा गोष्टींवर या बैठकीत चर्चा केली जाणार असून पालिका प्रशासनालाही यावेळी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal chemical companies operating at gip dam in ambernath
Show comments