डोंबिवली पूर्व भागातील सावरकर रस्त्यावरील वाहनतळाच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधलेली बेकायदा झोपडी महापालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारी जमीनदोस्त केली.
शहरात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नाही. वाहनतळांच्या जागा ठेकेदारांनी बळकावून ठेवल्या आहेत. असे असताना सावरकर रस्त्यावरील वाहनतळाची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात जाण्याची शक्यता होती. स्थानिक नगरसेविकेच्या तत्परतेमुळे जागा बळकावण्याचा झोपडीधारकांचा प्रयत्न फसला.
सावरकर रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी महापालिकेचे वाहनतळासाठी आरक्षण आहे. या आरक्षित जागेवर कैलास डोंगरे याने झोपडी बांधली होती. झोपडीचा विस्तार होत असल्याने नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी ही वाहनतळाची जागा झोपडीधारकाकडून बळकावली जाणार असल्याने झोपडी तोडण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती.
उपायुक्त सुरेश पवार यांनी ‘फ’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी यांना या झोपडीवर कारवाईचे आदेश दिले. कैलास डोंगरे यांना पालिकेने झोपडीसंदर्भातील कागदपत्रे असतील तर ती सादर करण्याचे आदेश दिले. डोंगरे यांनी दिलेल्या कालावधीत कोणतेही कागदपत्र सादर केली नाहीत. त्यामुळे गुरुवारी दुपारी प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांच्या पथकाने ही झोपडी पाडली.
शबरातील बहुतांशी आरक्षणे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. आपण आपल्या प्रभागातील आरक्षण अतिक्रमणाच्या विळख्यात जाऊ नये म्हणून ही झोपडी पाडून घेतली, अशी माहिती नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा