ठाणे : दिवा शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने गाजत असतानाच, भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शहर बकाल होण्यास शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि पालिका अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पुराव्यांसह तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्यावेळी बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन भरवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यानिमित्ताने दिव्यातील शिवसेना (शिंदे गट )आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाटय़ावर आल्याचे दिसून येत आहे.
राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्रित सत्तेवर असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील दिवा परिसरात मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये फारसे पटत नसल्याचे चित्र आहे. या नेत्यांमध्ये असलेले विळा-भोपळय़ाचे नाते पुन्हा समोर आले आहे. दिवा शहर बकाल होण्यास शिवसेना (शिंदे गट) दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी आणि पालिका अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला.
दिवा शहरात पाण्याचा मोठा प्रश्न असतानाही पिण्याचे पाणी बेकायदा बांधकामांना देण्यात येत आहे. आर्थिक लाभासाठी येथील प्रशासन व स्थानिक शिवसेना बेकायदा बांधकामाचा भस्मासूर उभा करत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी देऊनही पालिका प्रशासन अर्थपूर्ण संबंधामुळे बेकायदा बांधकामांवर कारवाई करत नसून त्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्यावेळी बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन भरवणार आहे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
एकीकडे क्लस्टर योजना होत असताना दुसरीकडे अनधिकृत बांधकाम जोमाने वाढत असल्याने क्लस्टर योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात शिवसेना (शिंदे गट) दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
स्लॅबमागे ३ लाख रुपये..
दिव्यातील नागरिकांना प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहीत. स्लॅबमागे ३ लाख रुपये घेऊन दिवा शहरात बेकायदा बांधकामे जोमाने सुरू आहेत. याला आयुक्त, पालिका अधिकारी प्रितम पाटील आणि दिव्यातील शिवसेनेचे नेते जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते आरोप करीत असून त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाचा पोटशूळ का आहे, हे माहीत नसून ते प्रत्येक कामात टीका करीत आहेत. वरिष्ठांनी केलेली शिवसेना आणि भाजप युती त्यांना बहुतेक मान्य नसावी. तसेच त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत. बेकायदा बांधकामांमध्ये एका पक्षाचा नेता आहे की सगळय़ा पक्षांचे नेते आहेत, हे सर्वाना माहीत आहे. – रमाकांत मढवी, दिवा शहरप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)