लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारी नदीच्या पात्रातील झाडे तोडून तेथे भराव टाकून बेकायदा बांधकामे उभारणीसाठी जोरदार तयारी भूमाफियांनी सुरू असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. रात्रीच्या वेळेत जेसीबीच्या उजेडात ही कामे केली जात असल्याचे रहिवाशांनी सांगितले. दिवसा या जागेत कोणी दिसत नाही. पण रात्री आठ वाजल्यानंतर गांधारी नदीच्या काठी ट्रक, जेसीबी, कामगारांची पहाटे चार वाजेपर्यंत वर्दळ असते. रात्रीच्या वेळेत झाडे तोडून ती रात्रीच गायब करुन टाकली जातात. तोडलेल्या भागात सीमेंटचा राडारोडा, भरावाची माती आणून टाकली जाते. नदीला खेटून ही कामे केली जात आहेत. पोलीस, स्थानिक महसूल अधिकारी यांना या महत्वपूर्ण विषयाची चाहूल लागत नसल्याने पर्यावरणप्रेमी, परिसरातील रहिवासी हैराण आहेत.
कल्याण, डोंबिवलीतील आरक्षित भूखंड, सरकारी जमिनी बेकायदा बांधकामे करुन हडप केल्यानंतर भूमाफियांनी आपला मोर्चा आता गांधारी नदी पात्राकडे वळविला आहे. गांधारी नदी भागातून येत्या काळात मुंबई-बडोदा रस्ता, विरार-अलिबाग द्रुतगती मार्ग, गांधारी पुला जवळ दुसरा जोड पूल उभारण्यात येणार आहे. वाहतुकीचे मोठे केंद्र येत्या काळात गांधारे परिसर होणार असल्याने त्यापूर्वीच मोक्याची जागा हडप करण्यासाठी भूमाफियांनी गांधारी नदी पात्रात जेसीबीने उकरुन तेथे मातीचे भराव टाकून बेकायदा बांधकामांची तयारी सुरू केली आहे, असे स्थानिकांनी सांगितले. अशाप्रकारे नदी पात्र भराव टाकून बंदिस्त केले जाऊ लागले पुराचे पाणी परिसरात पसरणार आहे अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली.
हेही वाचा… मुंबईतील रिक्षा चालकाची डोंबिवलीत दादागिरी, महिलेला जखमी करुन पळण्याचा प्रयत्न
भूमाफिया दहशत, शस्त्र सज्ज असल्याने कोणीही रहिवासी त्यांच्या या बेकायदा बांधकामाला विरोध करण्यासाठी पुढाकार घेत नाही. याविषयी रहिवासी महसूल विभाग, पोलीस, पालिकेकडे तक्रारी करण्यास घाबरत आहेत. पोलिसांची रात्रभर गस्त सुरू असते. त्यांना ही नदी पात्रातील हालचाल दिसत नाही का, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. महसूल विभाग, पोलिसांनी संयुक्तपणे नदीपात्रात टाकण्यात आलेले भराव उद्धवस्त करून टाकावेत, अशी मागणी रहिवासी करत आहेत.