लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील काळुबाई मांढरादेवी मंदिरा लगत खाडी किनारी जाण्याच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दोन भूमाफियांनी एक बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे. यापूर्वी दोन वेळा पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी या इमारतीवर कारवाई करुन माफियांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.

संपूर्ण इमारतीला बाहेरुन हिरवी जाळी लावून आतील भागात चारही बाजुने सामासिक अंतर न सोडता बाजुच्या इमारतींना धोका निर्माण होईल अशा पध्दतीने हे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीचे सांडपाणी, मलपाणी वाहून जाण्यासाठी गटार बांधणीसाठी माफियांनी इमारतीच्या चारही बाजुने जागा सोडलेली नाही.

हेही वाचा… दुचाकीवर रिल्स करणे पडले महागात, तरूण-तरूणीवर गुन्हा दाखल

या बांधकामासंबंधी पालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, या बांधकामाला नगररचना विभागाने परवानगी दिलेली नाही, असे सांगितले. येत्या काळात या रस्त्यावरुन बाह्यवळण रस्त्याकडे जाणारी वाहतूक होणार आहे. उमेशनगर, देवीचापाडा, रेतीबंदर, आनंदनगर भागातील वाहने याच रस्त्यावरुन देवीचापाडा जेट्टी, टिटवाळ्याकडून येणाऱ्या बाह्य वळण रस्त्याकडे जाणार आहेत. कल्याण, माणकोली पुलाकडे जाण्याचा मधला मार्ग म्हणून खाडी किनारा रस्ता असणार आहे. त्या रस्त्यावर ही इमारत बांधल्याने येत्या काळात या इमारतीमुळे वाहतुकीला अडथळा येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… निराधार योजनेत लाचखोरी, सेतू संचालकासह सहसंचालकाला अटक

गणेशोत्सवाच्या काळात गणपती विसर्जन मिरवणुका याच रस्त्यावरुन देवीचापाडा खाडी किनारी जातात. वर्दळीच्या रस्त्यावर २७ सदनिका असलेली इमारत बांधल्याने या इमारती मधील रहिवासी त्यांची वाहने कोठे उभी करणार. या बेकायदा इमारतीला पालिकेकडून पाणी पुरवठा मंजूर होणार नसल्याने पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरुन चोरुन पाणी पुरवठा होण्याची शक्यता परिसरातील रहिवाशांनी वर्तविली. नियमित कर, देयक भरणाऱ्या नागरिकांच्या नागरी सुविधा, पाणी पुरवठ्यावर या बेकायदा इमारतीचा परिणाम होणार आहे.

हेही वाचा… डोंबिवलीतील गरीबाचापाडा भागात विजेचा लपंडाव

पालिकेने दोन वेळा कारवाई करुनही तिसऱ्यांदा ही इमारत उभारण्यात आल्याने प्रशासनाचे या बांधकामाकडे लक्ष आहे की नाही, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. काही जागरुक नागरिकांनी या बेकायदा इमारतीच्या पालिका आयुक्त, उपायुक्त अतिक्रमण नियंत्रण यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू असताना ह प्रभागातील बीट मुकादम, पर्यवेक्षकांना हे बांधकाम दिसते की नाही, असे प्रश्न रहिवासी करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal construction of seven floors building in devichapada dombivli dvr