ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या काळात ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला होता. त्यापाठोपाठ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे पुरावे समाज माध्यमांवर सादर केले आहेत. येथील बांधकामांची छायाचित्र प्रसारित करत त्यावर कारवाई करून दाखविण्याचे आव्हान त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांविरोधात तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष मोहिम हाती घेतली होती. यामध्ये इमारतींचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले होते. लोकसभा निवडणुक काळात पालिका यंत्रणा व्यस्त असल्याचा फायदा घेऊन भूमाफिया पुन्हा सक्रीय झाले. यासंबंधीच्या तक्रारी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे प्राप्त होताच त्यांनी भूमाफियांनी उभारलेली बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर शहरात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. काही दिवसांपुर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शहरात बेकायदा बांधकामे सुरु असल्याच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त करत पालिका प्रशासनावर टिका होती. त्यापाठोपाठ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी शहरात बेकायदा बांधकामे सुरु असल्याचे पुरावेच समाज माध्यमांवर सादर केल्याने खळबळ उडाली आहे. एकट्या दिवा भागात ८८ बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा अंदाज घाडीगावकर यांनी वर्तविला. त्याचबरोबर कळवा आणि मुंब्रा भागातही बेकायदा बांधकामे सुरूच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. .या तक्रारीची शहानिशा करून कारवाई करावी, अशा सुचना उपायुक्तांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिल्या होत्या. यानंतरही कारवाई होत नसल्यामुळे अखेर घाडीगावकर यांनी कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात सुरु असलेल्या बेकायदा बांधकामाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली. हा घ्या बेकायदा बांधकामांचा पुरावा आणि त्यावर कारवाई करून दाखवा, असे आव्हानही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहे.