ठाणे : ठाणे महापालिका प्रशासनाच्या कारवाईमुळे गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असलेली बेकायदा इमारती उभारणीची कामे भुमाफियांनी पुन्हा सुरू केली असून नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागासाठी असलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बांधकामाची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करत त्यास पालिका आणि शासनाचा अभय असल्याची टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
घोडबंदर येथील कोलशेत भागातील खाडीकिनारी परिसरामधील खारफुटीवर भुमाफियांनी भराव टाकून अतिक्रमण केल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. खाडी किनारी भरावाचा मुद्दा विधानसभा अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर भराव रोखण्यासाठी खाडीकिनारी भागात जाणाऱ्या रस्त्यांवर पालिकेने चर खणले होते. ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दाही यापूर्वी गाजला होता. तत्कालीन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बेकायदा बांधकामांविरोधात विशेष मोहिम हाती घेतली होती. परंतु त्यांच्या बदलीनंतरही बंदावस्थेत असलेली बेकायदा बांधकामे पुन्हा उभारण्याची कामे भुमाफियांनी सुरू केली आहेत.
हेही वाचा – टिटवाळ्यातील बेकायदा चाळी भुईसपाट
कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे उभारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच आता नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागासाठी असलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत बेकायदा बांधकामे सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या भागात कोणत्या ठिकाणी बेकायदा बांधकामे सुरू आहेत आणि त्याची छायाचित्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहेत.
हेही वाचा – बदलापूर : मुलींच्या अत्याचाराप्रकरणी मुख्याध्यापिकेसह चौघांचे निलंबन, शाळेचा माफीनामा
बाळकुम भागात पाडा नंबर ३ मधील जय जलाराम सोसायटीच्या मागे, बाळकुम पाडा नंबर २ मधील स्मशानभूमी समोर, बाळकुम पाडा नंबर १ मधील एचडीएफसी बँक एटीएमजवळ बेकायदा इमारत उभी राहत असल्याचा दावा घाडीगावकर यांनी केला आहे. ही बांधकामे महापालिका आणि शासन यांचे थेटपणे अभय असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यानिमित्ताने बेकायदा बांधकामांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.