डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्याच्या सीमारेषेत भूमाफियांनी सात माळ्याचे बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामामुळे मानपाडा रस्त्याचे भविष्यात रुंदीकरण करायचे असेल तर या बेकायदा इमारतीचा मोठा अडसर उभा राहणार आहे. एवढेच नव्हे तर या इमारतीच्या बाजुला ग्रामदैवत गावदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचा प्रदक्षिणा मार्गही या बांधकामामुळे बंद झाला आहे.
हेही वाचा >>> ठाणे : रेल्वे पूलाच्या कामामुळे मध्यरात्री कोपरी पूल वाहतूकीसाठी बंद
यासंदर्भात डोंबिवलीतील आठ जागरुक नागरिकांनी पालिका आयुक्त, फ प्रभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या बेकायदा बांधकामांवर कारवाई होण्यापूर्वीच बांधकाम घाईत पूर्ण करायचे. सदनिकांमध्ये बिगारी कामगार, झोपडपट्टीतील रहिवासी तात्पुरत्या स्वरुपात आणून या इमारतीमध्ये रहिवास सुरू झाला आहे, असे पालिकेला दाखवयाचे अशा हालचाली भूमाफियांनी सुरू केल्या आहेत.
डोंबिवलीतील पांडुरंगवाडी भागात पुरातन गावदेवी मंदिर आहे. या मंदिराच्या बाजुला उद्यानाचे आरक्षण, त्याच्या बाजुला खासगी जमिनीवर दोन ते तीन चाळी होत्या. त्या चाळी धोकादायक झाल्याने पडझड होऊन कोसळल्या. तेथील रहिवासी नंतर परिसरात घर खरेदी, भाड्याच्या जागेत राहू लागले. अनेक वर्ष मंदिराच्या बाजुचा चाळीचा भूखंड मोकळा होता. डोंबिवली एमआयडीसी, आजदे, सागर्ली भागात मागील १० वर्षात सुमारे १०० हून अधिक बेकायदा इमारती बांधणाऱ्या भूमाफियाने काही महिन्यापूर्वी या भूखंडावर कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता बेकायदा बांधकाम सुरू केले.
या भूखंडाच्या जागेवरील चाळीत राहत असलेल्या रहिवाशांनी बांधकामाच्या ठिकाणी येऊन या जागेत आम्ही राहत होतो म्हणून दावा केला. त्यावेळी माफियाने रहिवाशांना तुम्हाला याठिकाणी सदनिका दिली जाईल असे आश्वासन दिले. बांधकामाला विरोध केला तर आपणास येथे कोणताही दावा करता येणार नाही म्हणून कोणीही रहिवाशाने विरोध केला नाही.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीतील अंतर्गत रस्ते कोंडीमुक्त; रस्त्यांवरील भंगार वाहनांची आधारवाडी कचराभूमीवर रवानगी
दरम्यानच्या काळात भूमाफियाने इमारतीच्या तळमजल्याला व्यापारी गाळे आणि २७ सदनिका बांधण्याचा आराखडा तयार करुन सात माळ्याच्या इमारतीचे नियोजन केले. तात्काळ रस्त्याच्या दर्शनी भागात हिरवी जाळी, भूखंडाच्या सभोवती बांधकाम कोणाला दिसू नये म्हणून बांधकाम सुरू केले. सुरुवातीला रहिवाशांना मंदिराच्या विस्ताराचे काम सुरू आहे का असे वाटले. परंतु, बांधकाम इमारतीचे आहे दिसल्यावर जागरुक सात ते आठ नागरिकांनी याप्रकरणी तात्काळ पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या.
वर्दळीच्या रस्त्यावर बेकायदा बांधकामे केले जात आहे. यामुळे मानपाडा रस्त्याच्या सीमारेषा, पदपथ, गटाराला धोका निर्माण होणार आहे हे माहिती असुनही मागील तीन महिन्याच्या कालावधीत पालिका अतिक्रमण नियंत्रण पथकाने या बांधकामावर कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भूमाफियांना पालिका अधिकाऱ्यांचा धाक राहिला आहे की नाही, असे प्रश्न शहरातील सुशिक्षित, नोकरदार वर्गाकडून उपस्थित केले जात आहे.
आयएएस आयुक्ताची मागणी
विद्यमान अधिकाऱ्यांचा धाक राहिला नसेल तर थेट भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) श्रेणीतील आयुक्त पालिकेत शासनाने नियुक्त करावा, अशी मागणी डोंबिवलीतील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. येत्या १० दिवसात गावदेवी मंदिरा जवळील बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले नाही तर या बांधकामाच्या समोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय काही जागरुक नागरिकांनी घेतला आहे. या इमारती मधील एक सदनिका ३५ लाख, गाळा ७५ लाखाला विक्री सुरू करण्यात आली आहे. माहिती कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनीही या बांधकामाच्या तक्रारी आयुक्तांकडे करुन संबंधित बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे.
विधीमंडळात चर्चा
नागपूरच्या विधीमंडळ अधिवेशनात सिन्नरचे आ. शिवाजीराव कोकाटे यांनी गावदेवी मंदिराजवळील बेकायदा बांधकामाचा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरुन पालिकेत खळबळ उडाली आहे. अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी हे बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत.
“ मानपाडा रस्त्यालगतचे गावदेवी मंदिराजवळील बांधकामाला स्थगिती दिली आहे. त्या बांधकामावर पाळत ठेवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर हे बांधकाम भुईसपाट केले जाणार आहे. हे बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करणार आहोत.”
भरत पाटील साहाय्यक आयुक्तफ प्रभाग, डोंबिवली