लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे : बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी दिवा प्रभाग समितीचे साहय्यक आयुक्त फारूक शेख यांना तीन महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले. परंतु या कारवाईनंतरही दिवा परिसरात बेकायदा बांधकामे सुरूच असल्याची बाब समोर आली असून याच मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत साहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांना निलंबित करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्याचबरोबर फेरीवाल्यांकडून हफ्ते वसुली होत असल्याचा आरोप करत याप्रकरणीही कारवाईची मागणी केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात भुमाफियांकडून बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. या मुद्द्यावरून पालिकेच्या कारभारावर सातत्याने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच या बांधकामांवर कारवाई करण्यास दिरंगाई केली तर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतरही दिवा परिसरात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच आयुक्त बांगर यांनी दिवा प्रभाग समितीचे साहय्यक आयुक्त फारूक शेख यांना तीन महिन्यांपूर्वी निलंबित केले. या कारवाईनंतर बेकायदा बांधकामे थांबतील असा अंदाज वर्तविला जात होता. प्रत्यक्षात मात्र हे अंदाज चुकीचे ठरले आहेत. दिवा परिसरात अजूनही बेकायदा बांधकामे सुरूच असल्याचे समोर आले असून या संदर्भात भाजपचे ठाणे शहराध्य निरंजन डावखरे, उपाध्यक्ष सुजय पतकी आणि दिवा मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी आयुक्त बांगर यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बेकायदा बांधकामांसंबंधी निवेदन देऊन साहय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीत देवीचापाडा येथे वर्दळीच्या रस्त्यात सात माळ्याची बेकायदा इमारत
दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांनी ४ मे २०२३ रोजी पत्र दिले आहे. त्यामध्ये दिव्यात अनधिकृत बांधकामे सुरू नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच प्रभाग क्षेत्रामध्ये नेहमी गस्त घालण्याचे काम बीट निरीक्षक यांच्यामार्फत होत असते. अनधिकृत बांधकाम होऊ नये, याची दक्षता घेतली जाते, अशी खोटी माहिती पत्रात देण्यात आल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे. तसेच तक्रार अर्ज कार्यालयामार्फत निकाली काढण्यात येत असल्याचेही पत्रात म्हटले आहे, असेही मुंडे यांनी सांगितले. हे पत्र मिळण्याआधीचे आणि त्यानंतरचे जीपीएस ठिकाणांसह अनधिकृत बांधकामाची छायाचित्र आयुक्तांकडे सादर केली आहेत. यावरून ही बांधकामे सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत, हे आता स्पष्ट दिसत होत आहे. अनधिकृत बांधकाम सुरू असल्याने दिव्यात पाणीटंचाई आहे. नागरी सुविधांवरती ताण येत आहे, पिण्याचे पाणी अनधिकृत बांधकामांना वळविले जाते, आरक्षित भूखंड व सरकारी जागा हडप केल्या जात आहेत. शहर कळत नकळत बकाल होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. साहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांच्याकडून अनधिकृत बांधकामाला पाठबळ दिले जात असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
फेरीवाल्यांकडून हफ्ते वसुली
दिवा शहरामध्ये पदपाथसाठी असणारी जागा आणि रस्त्याच्या दुतर्फा असणारी जागा ही दिवा स्थानकापासून आगासन रोड आणि मुंब्रा देवी कॉलनी भागात फेरीवाल्यांनी व्यापलेली आहे. माफीयांकडून वसुली करून बेकायदा फेरीवाले रस्त्याच्या दुतर्फा बसवले जातात. यामुळे शहर बकाल होत आहे. त्यामुळे अशा बेकायदा फेरीवाल्यांवर आणि फेरीवाल्यांना बसण्यास मदत करणाऱ्या माफीयांवर तात्काळ कारवाई करून पदपथ फेरिवालामुक्त करावेत, अशी मागणीही आयुक्तांकडे केल्याची माहिती मुंडे यांनी दिली.