लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली ठाकुर्ली भागातील मध्यमवर्गियांची वस्ती असलेल्या खंबाळपाडा भोईरवाडी भागात सरकारी जमिनीवर बेकायदा चाळी उभारणीसाठी भूमाफियांनी काही दिवसांपासून जोत्यांची उभारणी सुरू केली होती. ही कामे दिवसा पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊ नयेत म्हणून रात्रीच्या वेळेत ही बेकायदा बांधकामे केली जात होती. फ प्रभाग साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या ही बांधकामे निदर्शनास येताच, बुधवारी जेसीबी आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने या भागातील दहा बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
ठाकुर्ली चोळे गावाजवळील खंबाळपाडा, भोईरवाडी परिसर आखीव रेखीव पध्दतीने विकसित झाला आहे. मध्यमवर्गियांची वस्ती म्हणून हा भाग ओळखला जातो. या भागात बेकायदा चाळी उभारण्याचे धाडस मागील अनेक वर्षात अद्याप कोणी केले नव्हते. परंतु, खंबाळपाडा भागातील काही भूमाफियांनी या भागातील मोकळ्या सरकारी, काही खासगी जमिनींवर बेकायदा चाळी उभारणीचे नियोजन करून या भागात १० जोत्यांची बांधकामे रात्रीच्या वेळेत पूर्ण केली होती.
पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पावसाळ्यापूर्वीच्या कामाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रभाग हद्दींमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, पाणी कोठेही तुंबून नागरी वस्तीला धोका निर्माण होणार नाही यादृष्टीने पाहणी करण्याच्या आणि असे पाणी कोठे अडून राहत असेल तर तेथील अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश प्रभाग साहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत.
आदेशाप्रमाणे फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आपल्या प्रभागातील अतिक्रमण नियंत्रक पथकासह फ प्रभाग हद्दीतील ठाकुर्ली, चोळे, खंबाळपाडा, भोईरवाडी परिसरात फिरत होत्या. त्यावेळी त्यांना पालिकेची झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची घरे असलेल्या भागात मोकळ्या जागेत भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारणीसाठी १० हून अधिक जोते बांधले असल्याचे निदर्शनास आले. या जोत्यांच्या बांधकामांच्या चारही बाजुने इमारती आणि मध्येच ही बांधकामे केली तर या इमारतींच्या भागातून पावसाळ्यात वाहून येणारे पाणी या जोत्यांमुळे अडून या भागातील नागरी वस्ती, रस्ते पाण्याखाली जाण्याची भीती होती.
ही बेकायदे बांधकामे कोणी केली आहेत याची चौकशी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी भोईरवाडी, खंबाळपाडा भागात केली. ही बेकायदा बांधकामे असल्याने आणि पावसाळ्यात या बांधकामांमुळे पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होणार असल्याने साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या उपस्थितीत तोडकाम पथकाने जेसीबाच्या साहाय्याने ही बेकायदा जोत्यांची बांधकामे भुईसपाट करण्यात आली. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी आय प्रभागात असताना सुमारे चारशेहून अधिक बेकायदा चाळी, आठहून अधिक बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे काम केले आहे. गेल्या महिन्यात ठाकुर्ली भागातील एक बेकायदा इमारत त्यांनी भुईसपाट केली.
आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे फ प्रभाग हद्दीत पावसाळ्यात कोठेही पाणी तुंबण्याचे प्रकार होऊ नयेत, पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पाहणी सुरू केली आहे. या पाहणीच्यावेळी भोईरवाडी भागातील बेकायदा जोत्यांची बांधकामे निदर्शनास आली. ती भुईसपाट करण्यात आली. ही मोहीम सुरूच राहणार आहे. -हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग.