लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, सरोवरनगर, कुंभारखाणपाडा, राजूनगर भागातील नागरिकांना दररोज पुरेसा पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून कुंभारखाणपाडा येथे तीन वर्षापूर्वी जलकुंभासाठी एक जागा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून पालिकेकडून निश्चित करण्यात आली होती. या जागेवर बेकायदा झोपड्या स्थानिकांनी उभारल्या आहेत. त्या तोडून देण्यास स्थानिक भाई विरोध करत असल्याने, पालिकेने तीन वर्ष या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली नाही. त्यामुळे जलकुंभ उभारणीचे काम रखडले असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार चव्हाण यांनी पालिका वरिष्ठांसह पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत फैलावर घेतले.

मुंबईत सोमवारी भाजप प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्यासह पालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची डोंबिवलीतील विकास कामे विषयावर बैठक घेतली. या बैठकीत आमदार चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, सरोवर नेहमीच पाणी टंचाई असते. या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण स्वत साडे तीन वर्षापूर्वी कुंभारखाणपाडा भागात या परिसरासाठी एक स्वतंत्र जलकुंभ (सम्प-पप्म) उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. यासाठी एक जागा निश्चित केली होती. त्या जलकुंभाची उभारणी कुठपर्यंत झाली आहे, या जलकुंभाच्या उभारणीत कोणते अडथळे आहेत, असे प्रश्न आमदारांनी केले.

आणखी वाचा-उल्हासनगरात आणखी दोन बांगलादेशी पकडले,गुन्हे शाखा आणि विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई

यावेळी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी कुंभारखाणपाडा येथील जलकुंभाच्या प्रस्तावित जागेवर स्थानिकांनी बेकायदा बांधकामे केली आहेत. ही बांधकामे तोडून देण्यास स्थानिक विरोध करत आहेत. अधिकाऱ्यांचे हे बोल ऐकताच आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अशी तकलादू कारणे देऊन तुम्ही विकास कामे करण्यात चालढकलपणा करता. साडे तीन वर्षात तुम्ही भुक्कड भूमाफिया जलकुंभाच्या जागेवरील बेकायदा बांधकामे तोडण्यास विरोध करतात म्हणून प्रशासन तेथे जलकुंभ उभारणी करत नाही, हे चुकीचे आहे.

कुंभारखाणपाडा परिसरातील पाणी टंचाईचा विचार करून पालिकेने ही बेकायदा बांधकामे तातडीने तोडून जलकुंभाची कधीच उभारणी सुरू होणे आवश्यक होते. या कामासाठी निधी मंजूर आहे. ठेकेदाराला कामाचे आदेश आहेत. असे असताना प्रशासन यामध्ये चालढकलपणा करत आहे. जलकुंभाच्या जागेवरील बेकायदा बांधकामे कोणाचाही दबाव आला तरी तो झुगारून तातडीने भुईसपाट करा. तेथील जलकुंभ उभारणीचे काम तातडीने सुरू करावे, असे आदेश आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आणखी वाचा-कल्याणमध्ये इमारतीवरील सौरपट्ट्या साफ करताना तोल जाऊन मजुराचा मृत्यू

या भागात वर्चस्व असलेला एका राजकीय पुढारी या सर्व कामांत अडथळे आणत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. पालिका अधिकाऱ्यांनाही या राजकीय पुढाऱ्याचा त्रास आहे. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली असल्याचे समजते. आमदार चव्हाण यांनी या कामात अडथळे आणणाऱ्यांवर पालिकेने थेट कारवाई करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal constructions on proposed plot for jal kumbha at kumbhar khanpada in dombivali mrj