अग्निशमन दलाकडून परवाने रद्द झाल्यानंतरही कोपरीत व्यवसाय सुरूच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीत कोटय़वधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या ठाणे पूर्वेकडील (कोपरी) फटाका बाजारातील दुकानांवर येत्या काही दिवसांत संक्रांत ओढवण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या दुकानांचे अग्निशमन परवाने ३१ मार्चला रद्द केले आहेत. मात्र, तरीही न्यायालयाच्या आदेशाला आणि अग्निशमन विभागाला न जुमानता फटाका बाजार बिनदिक्कत सुरू असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी या दुकानांवर लवकरच पोलिसांच्या मदतीने कारवाईचे संकेत अग्निशमन विभागाने दिले आहेत.

संपूर्ण जिल्ह्य़ातील नागरिक कोपरी येथे फटाका खरेदीसाठी येतात. कोपरी परिसरात एकूण १८ फटाक्यांची दुकाने आहेत. यासाठी दुकानदारांनी केंद्र शासनाकडून परवाने मिळविले आहेत. तसेच ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागानेही या दुकानांना परवाने दिले होते. हे परवाने देताना काही अटी आणि शर्ती लागू केल्या होत्या. दोन दुकानांमध्ये १५ मीटरचे अंतर असणे बंधनकारक असून एका दुकानामध्ये दोन प्रवेशद्वार असणे गरजेचे आहे. फटाके साठवणुकीसाठी स्वतंत्र जागा असणे गरजेचे आहे. याशिवाय भर वस्तीत फटाक्यांची दुकाने नसावीत, अशा स्वरूपाच्या अटींचा समावेश होता. यापैकी एकाही नियमांचे पालन दुकानदारांकडून होत नसल्याची बाब समोर आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आगविरोधी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.  नियमांचे पालन न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले होते. तरीही कोपरीतील फटाका बाजार मात्र अजून सुरू असून त्यावर पालिकेकडून कारवाई झालेली नव्हती.

मार्चमध्ये परवाने रद्द

उच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर २०१६ रोजी नाशिकमधील जनहित याचिकेवर सुनावणी देताना अग्निशमन परवान्यांसाठी लागू असलेल्या नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्यातील पालिकांना दिले होते. या निकालाआधी ठाण्यातील मिलिंद कुवळेकर यांनीही या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अग्निशमन विभागाने कोपरीतील फटाका दुकानांची पाहणी करून त्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, दुकानदारांकडून त्याचे पालन केले जात नसल्याने अग्निशमन विभागाने ३१ मार्च २०१८ रोजी त्यांचे अग्निशमन परवाने रद्द केले.

आठ फटाके दुकानदारांचे अग्निशमन परवाने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर  रद्द करण्यात आले आहेत. ही दुकाने सुरू असल्यामुळे त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होईल.    -शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे

फटाका विक्रीसाठी केंद्र शासनाने आम्हाला परवाने दिले आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे अग्निशमन विभागाचाही परवाना असून हा व्यवसाय नियमाप्रमाणे सुरू आहे.     -सतीश पिंगळे, फटाका विक्रेते, कोपरी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal fireworks shops in thane
Show comments