डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील इम्प्रेस मॉलसमोरील डॉन बॉस्को शाळे पाठीमागील राधाई ही सात माळ्याची बेकायदा इमारत तोडून देण्यास कल्याण डोंबिवली पालिकेच्या ई प्रभागातील तोडकाम पथकाला बेकायदा जमाव जमवून विरोध करणाऱ्या राधाई या बेकायदा गृहसंकुलातील १३ रहिवाशांसह १५० हून अधिकच्या जमावावर पालिकेच्या ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.
रोहित गोसावी, दत्ताराम घोगरे, दत्तात्रय जाधव, सुमीत गुरव, शशिकांत नामये, संजय होनळकर, संदेश गाडवे, समीर देशमुख, वेंकटाचलम शर्मा, सुंदरेश राजगोपाल शर्मा, दीपक मिसाळ, सोमीनाथ साबळे, प्रवीण पावशे अशी गुन्हा दाखल झालेल्या रहिवाशांंची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, नांदिवली पंचानंद येथे राहणारे जयेश हिरामण म्हात्रे यांच्या मालकीची इम्प्रेस नांदिवली पंचानंद येथील v शाळेच्या पाठीमागे जमीन आहे. या जमिनीवर स्वस्तिक होम्सचे देवेन रवींद्र भगत, उमेश रामदास पाटील भूमाफियांनी दहशतीचा अवलंब करून चार वर्षापूर्वी जयेश यांच्या जमिनीचा ताबा घेतला. या जमिनीवर कल्याण डोंबिवली पालिका, महसूल विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली. महारेराचा बनावट क्रमांक या इमारतीला घेतला. ही इमारत अधिकृत आहे असे दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी अधिकाऱ्यांच्या संगनमताने या राधाई बेकायदा इमारतीमधील सदनिका दस्त नोंदणी करून घर खरेदीदारांना विकल्या.
हेही वाचा…ठाणे : आर्थिक फसवणुकीसाठी देशासह परदेशात सीमकार्डचा पुरवठा, सीमकार्डचा पुरवठा करणाऱ्या तिघांना अटक
या बेकायदा इमारतीवर कल्याण डोंबिवली पालिकेकडून कारवाई नसल्याने जयेश यांनी मुंबई उच्च न्यायालयात पालिकेविरुध्द दोन वर्षापूर्वी याचिका दाखल करून ही इमारत तोडण्याची मागणी केली होती. न्यायालयाने राधाई इमारतीची जमीन जयेश यांच्या मालकीची असल्याने या जमिनीवरील बेकायदा इमारत तोडण्याचे आदेश पालिकेला दिले.
मंगळवारी सकाळी ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, जे प्रभागाच्या सविता हिले राधाई इमारत जमीनदोस्त करण्यासाठी तोडकाम पथक घेऊन गेले. तेथे राधाई मधील रहिवाशांनी १५० हून अधिक बेकायदा जमाव जमवून राधाई इमारतीकडे जाणारे रस्ते बंद केले. जेसीबीच्या समोर आडवे पडून रस्ता बंद केला. जमावाने पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मानपाडा पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त असताना जमावाच्या विरोधामुळे पालिकेला राधाई इमारत तोडता आली नाही. बेकायदा जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणल्या बद्दल साहाय्यक आयुक्त जगताप यांंनी रहिवाशांसह जमाविरुध्द तक्रार केली आहे.
राधाई इमारतीमधील रहिवाशांनी तोडकामाला विरोध केला असला तरी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या इमारतीवर पुन्हा पोलीस बंदोबस्तात निश्चित कारवाई केली जाणार आहे. – चंद्रकांत जगताप, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग.
हेही वाचा…विश्लेषण : नवे ठाणे रेल्वे स्थानक महत्त्वाचे का? ते कधी कार्यान्वित होणार?
राधाई संकुल तोडण्यास भाजपच्या कार्यकर्त्यानी प्रखर विरोध केला. पालिका, पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत. भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नाहीत तर ही माहिती आपण उच्च न्यायालयात देणार आहोत. मानपाडा पोलिसांनीही या बेकायदा इमारत प्रकरणी काही महिन्यांपासून लालफितीत असलेला गु्न्हा दाखल करावा. – जयेश म्हात्रे, जमीन मालक व याचिकाकर्ते.