डोंबिवली – डोंबिवली जवळील गोळवली गाव हद्दीतील शिळफाटा रस्त्यालगतचा शुभारंभ बॅन्क्वेट हाॅल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या आदेशावरून कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या कारवाईत भुईसपाट केला. ग्रामपंचायतीला बांधकाम परवानगीचे अधिकार आहेत का, असा प्रश्न करत, न्यायालयाने गोळवली ग्रामपंचायतीच्या बांधकाम परवानगीचा आधार घेऊन उभारण्यात आलेले शुभारंभ हाॅलचे बांधकाम बेकायदा आहे, असा निष्कर्ष नोंदविला.
हे बांधकाम बेकायदा असल्याने ते आपण स्वताहून तोडून घेता की आम्ही आदेश देऊ, असे प्रश्न न्यायालयाने पालिकेच्या वकिलाला केले. पालिकेचे वकील ॲड. संदीप शिंदे यांनी दोन दिवसात हे बेकायदा बांधकाम आश्वासन न्यायालयाला दिले. पालिकेच्या आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी शनिवारी सुट्टी असुनही आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून शुभारंभ हाॅलवर कारवाई सुरू केली.
हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांच्या बैठका रद्द, ठाण्यातील निवास्थानी एकनाथ शिंदे घेत आहेत विश्रांती
गोळवली गाव हद्दीत मदन गुप्ता यांच्या मालकीचा तीन माळ्याचा वाणीज्य वापराचा शुभारंभ बॅन्क्वेट हाॅल होता. हे बांधकाम बेकायदा असल्याच्या तक्रारी माहिती कार्यकर्त्या प्रीती कुथे यांनी पालिका आयुक्त ते आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडे मागील दोन ते तीन वर्षात केल्या होत्या. यापूर्वी दोन वेळा या बांधकामावर कारवाई झाली होती. सततचा पाठपुरावा करूनही पालिकेकडून कारवाई होत नसल्याने माहिती कार्यकर्त्या कुथे यांनी ॲड. निखील वाजे, ॲड. वीरेन तपकीर यांच्या साहाय्याने उच्च न्यायालयात याचिका करून, हे बेकायदा बांधकाम तोडण्याची मागणी केली होती.
न्यायालयाने सर्व बाजू ऐकून हे बांधकाम बेकायदा असल्याचा निष्कर्ष काढून चार महिन्यापूर्वी हे बांधकाम तोडण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यावेळी हाॅल मालकाकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. न्यायालयाने तोडकामाला अंतरिम स्थगिती दिली होती. शुभारंभ हाॅलचे प्रकरण गेल्या आठवड्यात पुन्हा सुनावणीला आले. न्यायालयाने शुभारंभ हाॅलचा सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेला इमारत बांधकाम आराखडा सादर करण्याचे आदेश हाॅल मालकाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना दिले. गोळवली ग्रामपंचायतीने बांधकामाला मंजुरी दिल्याची ठरावाची प्रत न्यायालयाला दाखविण्यात आली. न्यायालयाने ही परवानगी बोगस असल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यानंतर पालिकेच्या वकिलाने येत्या दोन दिवसात हे बांधकाम तोडण्यात येईल, असे आश्वासन न्यायालयाला दिले.
हेही वाचा >>>ठाणेकरांपुढे पाच दिवस पाणीसंकट, पुढील पाच दिवस ३० टक्के पाणी कपात
साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी जेसीबी, तोडकाम पथकाच्या साहाय्याने बेकायदा हाॅल तोडण्याची कारवाई शनिवारी सुरू केली. सोमवारी शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने शुभारंभ हाॅल भुईसपाट करण्यात आला.
गोळवली ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी घेऊन शुभारंभ हाॅलची उभारणी करण्यात आली होती. हाॅल मालक मदन गुप्ता या बनावट कागदपत्रांवर विसंबून होते, न्यायालयाने या बेकायदेशीर कृत्यावर टीका केली. न्यायालयाने हे बांधकाम बेकायदा असल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यामुळे हाॅलवर कारवाई झाली.-ॲड. निखील वाजे, याचिकाकर्ता वकील.
उच्च न्यायालयाने शुभारंभ हाॅल बेकायदा असल्याचा आदेश दिल्याने, न्यायालयाच्या आदेशावरून आयुक्त, उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे बेकायदा बांधकाम भुईसपाट करण्यात आले.-भारत पवार साहाय्यक आयुक्त,आय प्रभाग, कल्याण.