कल्याण – कल्याण पूर्वेतील आय प्रभागातील चिंचपाडा भागातील २२ जीन्सचे कारखाने आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी पोलीस बंदोबस्तात पालिका तोडकाम पथकाच्या साहाय्याने मंगळवारी जमीनदोस्त केले. यावेळी काही स्थानिक मंडळी या कारवाई विषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी आली होती, पण त्यांना दाद न देता पालिका पथकाने हे सर्व कारखाने जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उल्हासनगरमधील जीन्स कारखाने शहरातून पंधरा वर्षापूर्वी हटविण्यात आले. या कारखान्यांमुळे शहरात वायू, जलप्रदूषण होत असल्याच्या वाढत्या तक्रारी होत्या. नागरी वस्तीत हे कारखाने सुरू करण्यास प्रतिबंध आहे. काही जीन्स कारखाना चालक कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, आशेळे, माणेरे परिसरातील काही स्थानिक जमीन मालकांना हाताशी धरून हे कारखाने सुरू करत आहेत.

यापूर्वीही या भागातील सुमारे ४० हून अधिक जीन्स कारखाने आय प्रभागाच्या तत्कालीन साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी भुईसपाट केले होते. हे कारखाने मालकांनी पुन्हा चोरून लपून उभे केले होते. हे कारखाने कोणाला दिसू नयेत म्हणुन या कारखान्यांवर ताडपत्री, गोणपाटे टाकण्यात आली होती. या कारखान्यांच्या ध्वनी, वायु प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी चिंचपाडा भागातील रहिवाशांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडे केल्या होत्या. आमदार गायकवाड यांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण येथील अधिकाऱ्यांना सूचित केले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला सूचित केले होते.

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांना चिंचपाडा भागातील जीन्सचे कारखाने जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी दुपारी साहाय्यक आयुक्त पवार पालिकेचे तोडकाम पथक घेऊन पोलीस बंदोबस्तात चिंचपाडा येथे पोहचले. तेथील २२ जीन्सचे कारखाने, त्यांची यंत्र जेसीबाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. ही कारवाई सुरू असताना काही तथाकथित पुढारी जीन्स कारखाने मालकांचा कैवार घेऊन पुढे आले होते. पण पवार यांनी त्यांची समजूत काढली. पुढे कारवाई सुरूच ठेवली.

स्थानिक जमीन मालक जीन्स कारखान्यांना भाड्यासाठी जमिनी देत असल्याने कल्याण पूर्वेत बेकायदा जीन्स कारखान्यांचा विषय संपत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

चिंचपाडा येथील जीन्स कारखान्यांचा परिसरातील रहिवाशांना त्रास होत होता. याविषयी आमदार सुलभा गायकवाड यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून २२ जीन्स कारखाने जमीनदोस्त करण्यात आले. हे कारखाने पुन्हा उभारले तर त्यांच्या फौजदारी कारवाई केली जाणार आहे. भारत पवार, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal jeans factories in chinchpada kalyan demolished by kdmc zws