उड्डाणपुलाखाली बेकायदा वाहने उभी करण्याचे प्रकार शहरात सर्रास दिसून येतात. मात्र घोडबंदर येथील कापुरबावडी उड्डाणपुलाखाली चक्क छोटय़ा वस्त्या उभ्या केल्या आहेत. रस्त्यावरच स्वयंपाक करण्यासाठी चुलीसुद्धा मांडल्या आहेत.

कापुरबावडी येथील उड्डाणपुलाखाली गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून भटके नागरिक वास्तव्य करीत असल्याचे समोर आले आहे. या नागरिकांकडून स्वयंपाक तयार करण्यासाठी उड्डाणपुलाखालीच चुली मांडण्यात येत आहेत. एकाला एक खेटून या चुली असल्याने इथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. दुपारी आणि सायंकाळी येथे जुगाराचे अड्डे तयार होतात. या उड्डाणपुलापासून अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर कापुरबावडी पोलीस ठाणे आहे. मात्र पोलिसांकडून या व्यक्तींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. उड्डाणपुलाच्या एका कोपऱ्यात एका व्यक्तीने केशकर्तनालय सुरू केले आहे.

मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे माजिवडा भागात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, कंत्राटदाराकडून करण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा उड्डाणपूल वादग्रस्त ठरला होता. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, अशा प्रकारची बेकायदेशीर वस्ती उड्डाणपुलाखाली सुरू झाल्याने उड्डाणपुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

Story img Loader