कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर दररोज सुमारे दीडशे दुचाकी अरूंद रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जातात. या बेकायदा वाहनतळामुळे रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका, डाॅक्टरांना त्यांची खासगी वाहने आणणे मुश्किल झाले आहे. या बेकायदा वाहनतळावर वाहतूक विभाग, पालिका प्रशासनाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत नसल्याने रुग्ण नातेवाईक, रुग्णालय प्रशासन त्रस्त आहे.
कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानकाजवळ कल्याण जिल्हा न्यायालयाच्या समोरील भागात पालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय आहे. या रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी मुरबाड या मुख्य रस्त्यापासून आतील भागात ५० मीटरचा आठ फूट रुंदीचा एक पोहच रस्ता आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी एकमेव हा अरूंद पोहच रस्ता आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक दुचाकी स्वार रुग्णालयाच्या प्रवेशव्दारासमोरील अरुंद रस्त्यावर दुतर्फा दुचाकी वाहने उभी करतात.
मुरबाड या मुख्य रस्त्यावरून रुग्णालयात येण्याच्या प्रवेशव्दारावर फेरीवाले, सिमेंटचे मोठे ठोकळे आहेत. रुक्मिणीबाई रुग्णालयालगत पालिकेच्या बीओटी प्रकल्पाच्या जागेत मागील काही महिन्यांपासून एक बेकायदा वाहनतळ काही खासगी व्यक्ति चालवित आहेत. या वाहनतळाच्या माध्यमातून पालिकेला एक पैशाचा महसूल मिळत नाही.
‘बीओटी’ प्रकल्पाच्या जागेतील बेकायदा वाहनतळावर दुचाकी आणण्यासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे जाणाऱ्या पोहच रस्त्याचा दुचाकी स्वार वापर करतात. त्यामुळे रुग्णालयाकडे जाणारा रस्ता वाहनांच्या कोंडीने गजबजून गेलेला असतो. याठिकाणी पंचायत समिती कार्यालय आहे. त्यांनाही या बेकायदा वाहनतळाचा त्रास होतो. या भागातील बेकायदा वाहनतळ चालविणाऱ्या मंडळींना राजकीय आशीर्वाद असल्याने याविषयावर उघडपणे कोणीही बोलत नाही.
रुग्णालयाची कोंडी
रुग्णालयात बाहेरून रुग्ण एखाद्या वाहनातून आणण्यात आला तर दुचाकीच्या बेकायदा वाहनतळामुळे वाहन रुग्णालय प्रवेशव्दारापर्यंत येत नाही. दूर अंतरावर रुग्णाचे वाहन उभे करून तेथून त्याला स्ट्रेचरवर रुग्णालयात आणावे लागते. रुग्णवाहिका या बेकायदा वाहनतळातून बाहेर काढताना चालकाला कसरत करावी लागते. रुग्णालयातील डाॅक्टरांना आपल्या मोटारी रुग्णालयात आणणे रुग्णालय प्रवेशद्वारासमोरील बेकायदा वाहनतळामुळे शक्य होत नाही. रुग्णालयातील बहुतांशी डाॅक्टर आपली दुचाकी किंवा रिक्षेने रुग्णालयात येतात, अशी खात्रीलायक माहिती आहे.
पालिका मुख्यालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वाहतूक विभाग, मालमत्ता विभाग या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्ण, नातेवाईक आश्चर्य व्यक्त करत आहेत. अधिक माहितीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांना संपर्क केला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावरील वाहनांमुळे होणाऱ्या अडथळ्यांसंदर्भात वाहतूक विभाग, स्मार्ट सिटी, वैद्यकीय विभाग यांना कळविले आहे. या वाहनांमुळे रुग्णवाहिका रुग्णालयात आणताना अडथळे येतात.- डाॅ. पुरुषोत्तम टिके,मुख्य वैद्यकीय अधिकारी, रुक्मिणीबाई रुग्णालय.
रुक्मिणीबाई रुग्णालयालगतच्या बीओटी प्रकल्पावरील जागेतील वाहनतळ हटविण्याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. या भागात स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे सुरू केली जात आहेत. त्यावेळी हा वाहनतळ हटविण्यात येईल.- रोहिणी लोकरे कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटी प्रकल्प.
(रुक्मिणीबाई रुग्णालयासमोरील बेकायदा वाहनतळ.)