ठाणे – ठाणे परिवहन सेवेच्या बसगाड्यांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ज्ञानोदय शाळा ते लोकमान्य टिएमटी आगारापर्यंतच्या रस्त्यावरील बेकायदा पार्किंग रहिवाशांनी शासकीय यंत्रणेच्या मदतीने हटविली आहे. यामुळे हा परिसर पार्किंगमुक्त झाला असून त्याचबरोबर या पार्किंगच्या आडून मद्य प्राशन करण्याचे सुरू असलेले प्रकारही थांबले आहेत. हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील लोकमान्यनगर हा दाटीवाटीचा परिसर आहे. या भागात इमारती, चाळी आणि म्हाडाच्या बैठ्या वसाहती आहेत. पण, याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिक रस्त्यांवरच बेकायदा वाहने उभी करतात. यामध्ये रिक्षा, दुचाकी, कार, टेम्पो अशा वाहनांचा समावेश असतो. लोकमान्यनगर टिएमटी आगार ते ज्ञानोदय शाळा या मार्गावर ही वाहने दुतर्फा उभी केली जातात. यामुळे बस वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. शिवाय, या पार्किंगआडून गैरप्रकार सुरू होते. या परिसरात मद्याचे दुकान आहे. तेथून मद्य खरेदी करून काही नागरिक पार्किंग केलेल्या वाहनांच्या आडोशाला जाऊन मद्यपान करायचे. त्याचबरोबर याठिकाणी प्रेमीयुगल बसण्याचे प्रकार वाढू लागले होते. याबाबत लोकप्रतिनिधींकडे रहिवाशी वारंवार तक्रार करित होते. परंतु कोणतीच कारवाई होत नसल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त होत होता. अखेर रहिवाशांनी शासकीय यंत्रणांची मदत घेऊन ही पार्किंग हटविली. या भागात खुली व्यायाम शाळा आहे. परंतु बेकायदा पार्किंगमुळे नागरिकांना तिथे जाता येत नव्हते. तसेच मद्याच्या बाटल्यांच्या काचा आणि इतर कचरा पडलेला असायचा. आता हा परिसर पार्किंगमुक्त झाल्याने नागरिकांना सकाळची प्रभात फेरीबरोबर येथे व्यायाम करणे शक्य झाले आहे.
लोकमान्यनगर बस डेपोपासून ते ज्ञानोदय शाळेपर्यंत पाचपाखाडी ठाणे म्हाडा हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या २६ इमारती आहेत. या इमारतींमध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्य करतात. या सर्व सोसायट्यांमधून २० ते २५ जणांनी एकत्रित येऊन एक समूह तयार केला. या समुहात तरुण वर्गापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील मंडळी आहेत. या मंडळींनी ठाणे महापालिका आणि ठाणे वाहतूक विभागाच्या मदतीने बेकायदा पार्किंगवर कारवाई केली. त्याचबरोबर फेरिवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. समूहातील नागरिक दररोज सकाळी ७.३० ते ९.३० यावेळेत शासकीय यंत्रणांसोबत फिरून बेकायदा पार्किंगवर कारवाई करतात. याठिकाणी वाहने उभी करू नये असे संदेशाचे फलक रहिवाशांनी स्वखर्चातून लावले आहेत.
हेही वाचा – ठाणे : विहिरीत पडलेल्या श्वानाची सुखरूप सुटका
आपला परिसर स्वच्छ सुंदर असला पाहिजे, असे प्रत्येकालाचा वाटते. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला. आम्हाला यामध्ये २० टक्के यश मिळाले आहे. हळूहळू आमच्या कामाची व्याप्ती आम्ही वाढवू. – रविंद्र परब, सचिव, ठाणे म्हाडा हौसिंग सोसायटी फेडरेशन.