लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रस्त्यावर काही दिवसांपासून वाहन चालक दोन रागांमध्ये दुचाकी उभ्या करून ठेवत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, बाजुला फेरीवाले बसत असल्याने फडके रस्त्यावरून चालणे नागरिकांना अवघड झाले आहे.

या रस्त्यावरून बसला वळसा घेणे अवघड जात आहे. फडके रोड डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी एकेरी वाहतुकीसाठी खुला आहे. तरीही अनेक वाहन चालक रेल्वे स्थानकाकडून वाहने घेऊन गणेश मंदिर दिशेने येतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. फडके रोडवर दुचाकी वाहने उभी करण्यास मज्जाव आहे. तरीही मुंबई, ठाण्याकडे जाणारे अनेक नोकरदार सकाळच्या वेळेत आपली दुचाकी फडके रोडवर पदपथाच्या कडेला लावतात. अशाप्रकारे प्रत्येक दुचाकी चालक आता अंतर्गत गल्ली बोळात दुचाकी न लावता वर्दळीच्या फडके रोडवर दुचाकी लावून कामाला जातो. समोरासमोर दोन दुचाकी उभ्या करण्यात येत असल्याने फडके रोडवरून येजा करण्यासाठी एकेरी मार्ग उपलब्ध होत आहे.

आणखी वाचा-सुरक्षेच्या कारणास्तव गणपत गायकवाड सकाळीच पोलिसांच्या फौजफाट्यासह न्यायालयात

फ़डके रोड बाजारपेठेचे ठिकाण आहे. अनेक ग्राहक आल्या वाहनाने येथे खरेदीसाठी येतात. त्यांची वाहने फडके रोडवर उभी असतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. फडके रोड बाजारपेठेचे ठिकाण आहे. या रस्त्यावर नव्या इमारतींना बांधकाम परवानगी देताना प्रत्येक इमारतीला तळ मजल्याला वाहनतळ अपेक्षित होते. कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच नव्याने उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतींना वाहनतळ उभारणीत सूट दिल्याची माहिती उघडकीला आली आहे. त्यामुळे या नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतीमधील व्यापारी, रहिवासी यांची चार चाकी वाहने नेहरू रस्ता, सावरकर रस्ता, आगरकर रस्ता भागात रस्त्यावर उभी केली जातात. फडके रोडवर मदन ठाकरे चौक ते बाजीप्रभू चौक दरम्यान अशीच एक इमारत बांधणाऱ्यांमध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे. या अधिकृत इमारतीवर दोन बेकायदा माळे बांधल्याची चर्चा आहे. हा लोकप्रतिनिधी आपल्या इमारतीच्या आजुबाजुला वाहने उभी राहू नयेत, फेरीवाले बसू नयेत म्हणून आता तक्रारी करत आहे.

आणखी वाचा-शिळफाटा उड्डाणपुलावरील पनवेल मार्गिकेचे लोकार्पण, जेएनपीटीसह ठाणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार

सकाळ, संध्याकाळ फडके रोडवरून कंपनी कामगारांच्या बस धावतात. याशिवाय केडीएमटी बस, मोटारी, रिक्षा यांची वाहतूक या रस्त्यावरून असते. या रस्त्यावर दोन रांगांमध्ये दुचाकी उभ्या करून ठेवण्यात येत असल्याने फडके रोड दररोज सकाळ, संध्याकाळ वाहन कोंडीत अडकत आहे.

वाहतूक विभागाचे या वर्दळीच्या रस्त्याकडे लक्ष नसल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे. फडके रोड भागात दररोज सकाळ, संध्याकाळ एक वाहतूक पोलीस तैनात करावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. डोंबिवली वाहतूक विभागात येण्यास कोणी अधिकारी इच्छुक नसल्याचे समजते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal parking of two wheelers in two rows on phadke road mrj