ठाणे शहरात बेकायदा धावणाऱ्या खासगी बसचालकाविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असली तरी त्यांच्या दंडात्मक रक्कमेचा खासगी बसचालकांना धाक उरलेला नाही. एका बसमागे दोन हजार रुपये दंड भरायचा आणि त्यानंतर दिवसभरात दंडाच्या रक्कमेसह नफा वसूल करायचा, असा उद्योग खासगी बसचालकांकडून सुरू आहे. तसेच एकाच बसवर जवळपास सत्तर ते ऐंशीवेळा दंडाची कारवाई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली असतानाही ठाणे प्रादेशिक विभागाकडून मात्र अशा बसचे परवाने रद्द करण्याची धाडसी कारवाई होताना दिसून येत नाही. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत असून त्याचा फायदा घेऊन खासगी बसचालकांचा शहरात बेकायदा व धोकादायक प्रवास सुरू आहे. या दोन्ही विभागांनी स्वतंत्र कारवाई करण्याऐवजी एकत्र कारवाई केली तर नक्कीच त्याचा परिणाम दिसून येईल.
गेल्या आठवडय़ात एका प्रवाशाला पाच रुपये कमी दिले म्हणून चालक आणि क्लिनरकडून बेदम मारहाण झाल्याच्या घटनेनंतर टीकेचे धनी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी शहरातील खासगी बसविरोधात कारवाईचा बडगा उगारला खरा, पण एकीकडे शहरात खासगी बसविरोधात दंडात्मक करवाई सुरू असली तरी दुसरीकडे मात्र या बसेस आजही रस्त्यावर बिनदिक्कतपणे धावत आहेत. याचाच अर्थ दंडाची रक्कम भरल्यानंतर सुटका होते, याची खात्री झाल्याने खासगी बसचालकांना वाहतूक पोलिसांची आणि त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रक्कमेचा धाक राहिलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. वाहतूक पोलिसांप्रमाणेच अशा बसेसवर कारवाई करण्याची तितकीच जबाबदारी आरटीओचीही आहे. मात्र ही जबाबदारी त्यांच्याकडून प्रभावीपणे पार पाडली जात नाही. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) एखाद्या सोसायटीच्या नावाने अशा खासगी बसला वाहतूक परवाने देण्यात येतात. मात्र, त्यांच्याकडून परवान्याचे उल्लंघन होत आहे का, यावर त्यांचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही. अशा बसच्या चालकांकडून परवान्यातील अटींचे उल्लंघन झाले तर त्यांचे वाहतूक परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्याचे अधिकार आरटीओकडे आहेत. या कारवाईमुळे कायमस्वरूपी बस सेवा बंद करावी लागत असल्याने खासगी बसचालकांमध्ये भीती आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरात बेकायदा सुरू असलेल्या खासगी बसचा तसेच त्यामधील चालक व क्लिनरच्या दादागिरीचा मुद्दा सातत्याने पुढे असतानाही आरटीओकडून त्यांच्याविरोधात परवाने रद्द करण्यासंबंधीची धाडसी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळेच खासगी बसचालकांचे फावले जात असून त्यांची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरूच आहे.
ठाणे शहराच्या पल्याड असलेल्या घोडबंदर भागात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यापैकी अनेक गृहसंकुलांनी शहरातील दळणवळणाच्या दृष्टिकोनातून खासगी बसचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी खासगी बसमालकांनी संबंधित गृहसंकुलांसोबत करार केले असून त्याआधारे या वाहतुकीसाठी आरटीओने संबंधित बसमालकांना वाहतुकीसाठी परवाने दिले आहेत. या बसमालकांनी गृहसंकुलातील रहिवाशांच्या वाहतुकीसाठी ठरावीक वेळेचे नियोजन आखले असून त्याच वेळेत रहिवाशांची बसमधून वाहतूक केली जाते. मात्र उर्वरित वेळेत जास्त पैसे कमविण्यासाठी या बसमधून शहरातील प्रवाशांची बेकायदा वाहतूक केली जाते. परवान्यांमध्ये त्यांना गृहसंकुलातील रहिवाशांव्यतिरिक्त अन्य प्रवाशांची वाहतूक करण्याचा अधिकार नाही. तरीही ठाणे ते घोडबंदर या मार्गावरील प्रत्येक बस थांब्यावरून प्रवाशांची वाहतूक करतात. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलाच्या पायथ्याशी प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. यामुळे पाठीमागून भरधाव येणारे वाहन आदळून मोठा अपघात होऊ शकतो तसेच महामार्ग ओलांडताना प्रवाशांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. त्यामुळे गृहसंकुलाच्या नावाने परवाने मिळवायचे आणि त्याआधारे शहरात बेकायदा प्रवाशी वाहतूक करायची, असा उद्योग खासगी बसचालकांनी सुरू आहे. खरे तर या बेकायदा खासगी वाहतुकीला लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांनी संयुक्त मोहीम राबविणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
दंडाचा धाक नाही अन् धाडसी कारवाई नाही..
ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर या मार्गावर बेकायदा सुरू असलेल्या बसचालकांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असून या बसचालकांविरोधात आतापर्यंत जवळपास साडेचार हजारहून अधिक केसेस केल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून करण्यात येतो. प्रत्यक्षात मात्र शहरात बेकायदा धावणाऱ्या बसेसचा आकडा सुमारे ४० ते ४५ इतकाच आहे. याचाच अर्थ वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार एका बसवर किमान सत्तर ते ऐंशीवेळा दंडात्मक कारवाई केल्याचे स्पष्ट होत आहे. परवान्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून एका बसमागे सुमारे दोन हजार रुपये दंड आकरण्यात येतो. त्याच पावतीच्या आधारे बसचालक दिवसभर बेकायदा वाहतूक करतो आणि त्यातून दंडाची रक्कम वसूल करतो. त्याच दिवशी दुसऱ्यांदा कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याने गाडी अडवलीच तर चालक त्यांना दंडाची पावती दाखवून सुटका करून घेतो. त्यामुळेच दंडाची रक्कम भरल्यानंतर सुटका होते, याची खात्री झाल्याने खासगी बसचालकांना वाहतूक पोलिसांची आणि त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रक्कमेचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे परवान्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बसमधील प्रति प्रवाशामागे सुमारे दोन हजार रुपये दंड आकारण्याचे अधिकार आरटीओला आहेत. याशिवाय संबंधित बस जप्त करून त्यांचे परवाने रद्द करण्याचेही अधिकार आहेत. मात्र आरटीओकडून अशा प्रकारची धाडसी कारवाई होताना दिसत नाही. ठाण्याचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी या बसविरोधात कारवाईसाठी आरटीओची पथके सोबत घेतल्यामुळे गेले काही महिने शहरातील बेकायदा बस वाहतूक बंद होती. परंतु लक्ष्मीनारायण यांची बदली होताच वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पुन्हा बस वाहतूक सुरू झाली आहे.
प्रवाशांचाही नाईलाज
ठाणे महापालिकेचा परिवहन उपक्रम पुरेशी प्रवासी सेवा पुरविण्यास अपयशी ठरल्याने शहरातील प्रवाशांना खासगी बसचा पर्याय सोयीस्कर वाटू लागला आहे. टीएमटीच्या तिकिटापेक्षा कमी पैशांमध्ये जलद प्रवास आणि सातत्याने बससेवा उपलब्ध होत असल्याने अनेक प्रवाशी खासगी बस वाहतुकीकडे वळले आहेत. खासगी बसचा प्रवास धोक्याचा असला तरी त्यांच्यापुढे वाहतुकीसाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे खासगी बसचालकांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत असतानाही प्रवाशांपुढे ते निमूटपणे सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.