डोंबिवली – डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. या संधीचा फायदा घेत या भागातील काही राजकीय मंडळींना कोपर पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानकालगतच्या जागा बेकायदा टपऱ्या बांधून हडप करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याच्या कोपऱ्यावर पदपथ बंद करून या टपऱ्या बांधण्यात आल्याने या भागात वाहतूक कोंडी होत आहे.
या टपऱ्यांच्या जागेत यापूर्वी वाहनचालक दुचाकी वाहने उभी करून ठेवत होते. त्यांची जागा या टपऱ्यांमुळे बंद झाली आहे. स्थानिक राजकीय मंडळी हा बांधकामाचा उद्योग करत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. ‘लोकसत्ता’ने गेल्या वर्षी कच्च्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या या टपऱ्यांविषयी वृत्त देताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन या टपऱ्या तोडून टाकल्या होत्या. आता पुन्हा राजकीय मंडळींनी बांबू, पत्रे बांधून उभारलेल्या कच्च्या टपऱ्या विटा, पत्रे बांधकामांनी पक्क्या केल्या आहेत. या टपऱ्यांच्या समोर दुचाकी, रिक्षा, मोटारी उभ्या करण्यात येत असल्याने कोपर रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवासी, दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना या भागातून बाहेर पडणे मुश्किल होत आहे.
हेही वाचा – डोंबिवली: महावितरणचे देयक ऑनलाईन प्रणालीतून भरुनही देयक न मिळाल्याचा महावितरणचा दावा
कोपर रेल्वे स्थानकाच्या जिन्या जवळ झाडांचे आडोसे घेऊन उभारलेल्या या बेकायदा टपऱ्यांवर रेल्वे आणि पालिकेने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. पालिकेच्या विकास आराखड्यातील रस्ता या बेकायदा टपऱ्यांमुळे बाधित झाला आहे. पदपथाचा मार्ग या टपऱ्यांनी बंद केला आहे. कोपर स्थानकातील प्रवासी गर्दी वाढल्याने या भागात प्रशस्त रस्त्यांची गरज येत्या काळात आहे. त्यावेळी पक्क्या बांधकामांच्या या टपऱ्यांमुळे विकासाला अडथळा येणार आहे. शहराच्या अनेक भागांत या टपऱ्या चालकांनी मालकी हक्काचे दावे न्यायालयात करून विकास कामांमध्ये अडथळे आणले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कोपर रेल्वे स्थानकाजवळील टपऱ्या रेल्वे, पालिकेने तातडीने तोडून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या टपऱ्यांच्या माध्यमातून एका राजकीय कार्यकर्त्याला दरमहा प्रत्येक टपरीमागे दोन ते तीन हजार रुपये भाडे मिळते, असे एका स्थानिकाने सांगितले.