कल्याण – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरून दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना नवी मुंबई, तळोजा भागातून येणारे अवजड वाहनचालक दिवसा शिळफाटा रस्त्यावरून वाहने घेऊन जात असल्याने डायघर, कल्याणमधील वाहतूक पोलिसांची कोंडी होत आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरात ही वाहने सकाळी सहाच्या वेळेत रोखून धरणे हे तेथील वाहतूक पोलिसांचे काम आहे. तेथील कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा होत असल्याने त्याचा फटका शिळफाटा रस्त्यावरील वाहनांना बसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई, तळोजा परिसरातून येणारी अवजड वाहने शिळफाटा रस्त्यावर कोळसेवाडी, डायघर वाहतूक विभागाने रोखून धरली तर ती उभी करायची कोठे, असा प्रश्न निर्माण होतो. अशा वाहनांना रोखून धरल्यानंतर त्यांना उभे राहण्यासाठी प्रशस्त वाहनतळ मुंब्रा, शिळफाटा रस्ता भागात नाही. या वाहनांना सोडल्याशिवाय पर्याय नाही, असे वाहतूक अधिकारी सांगतात.

हेही वाचा – ठाण्यातील ‘त्या’ अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिका आयुक्तांना आदेश

दिवसा अचानक ही अवजड वाहने समोर आल्यानंतर त्यांना फार काळ रोखून धरले तर या वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांच्या रांगा लागतात. सकाळच्या वेळेत नोकरदार वर्ग कामावर जात असतो. मुख्य रस्त्यावर एकही वाहन उभे राहणार नाही याचे नियोजन आम्हाला करावे लागते, अशी माहिती वाहतूक विभागाच्या एका वरिष्ठाने दिली.

शिळफाटा रस्त्यावरून सकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे. दुपारी एक ते चार वेळेत आवश्यक सेवेची अवजड वाहने या कालावधीत सोडण्यास वाहतूक विभागाला मुभा आहे. अलीकडे अनेक वेळा वाहतूक विभागाचे वेळेचे बंधन तोडून अनेक अवजड वाहनचालक नवी मुंबई, पनवेल भागातील वाहतूक पोलिसाला आर्जव करून शिळफाटा दिशेने प्रवेश करतो. हे वाहन एकदा शिळफाटा, मुंब्रा दिशेने आले की ते रोखून धरणे म्हणजे वाहतुकीला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे ते सोडावेच लागते, असे वाहतूक अधिकारी सांगतात.

उरण, नवी मुंबई, पनवेल भागातून निघणारी मालवाहू अवजड वाहने उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश भागात जाणारी असतात. या वाहन चालकांना मोठा टप्पा पार करायचा असतो. ते वाहन चालक आहे त्या परिस्थितीत वेळेच्या बंधनाचे उल्लंघन करून त्या भागात वाहतूक विभागाला दंड भरून पुढे निघून जातात. नवी मुंबई, उरण भागात अवजड वाहने रोखून धरली तर मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, असे नवी मुंबई भागातील वाहतूक पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपाला डावलले? भाजपामधून नाराजीचा सूर उमटू लागला

नवी मुंबई, तळोजा भागातून येणाऱ्या वाहनांना मुंब्रा बाह्यवळण रस्ता बंद असल्याने ते शिळफाटा, कल्याण रस्त्याने इच्छित स्थळी निघतात. याशिवाय ऐरोली मार्गे येणारी वाहने शिळफाटा रस्त्याने भिवंडी, नाशिक मार्गे इच्छित स्थळी जातात. ही वाहने थांबून ठेवण्यासाठी ५०० हून अधिक वाहने एकाच जागी उभी राहतील असे वाहनतळ (हँगर) नवी मुंबई, शिळफाटा भागात नाही. अनेक वाहनांमध्ये ज्वलनशील, अत्यावश्यक सेवेचा माल असतो. तो वेळीच घटनास्थळी पोहचणे आवश्यक आहे. डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. ही वाहने सोडावीच लागतात, असे वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal traffic of heavy vehicles during daytime from shilphata road ssb