कल्याण, डोंबिवलीत ‘बुस्टर पंपां’ची शोधमोहीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्य़ात निर्माण झालेल्या पाणीटंचाईसदृश परिस्थितीमुळे कल्याण-डोंबिवली पालिका खडबडून जागी झाली आहे. प्रशासनाने पाणी चोर शोध मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जे रहिवासी बुस्टर पंप लावून पाण्याचा दाब वाढवू पाहात आहेत, अशांवरही कारवाई केली जाणार आहे. महापालिका आयुक्त गोंविद बोडके यांनी सोमवारी यासंबंधीचे आदेश दिले.

यंदाच्या जूनपासून ऑगस्ट मध्यापर्यंत उत्तम पाऊस पडला. त्यामुळे ठाणे तसेच मुंबई परिसराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा कयास बांधला जात होता. मात्र, ऑगस्टच्या मध्यापासून पाऊस न पडल्याने जिल्ह्य़ाचा पाटबंधारे विभाग सतर्क झाला आहे. दर आठवडय़ाला धरणातील पाणीसाठय़ाचा आढावा घेतला जात आहे. पुढील वर्षांपर्यंत जिल्ह्य़ातील विविध शहरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करता यावा यासाठी पाटबंधारे विभागाने संपूर्ण जिल्ह्य़ात पाणीकपात लागू केली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात २२ टक्के कपात लागू करण्यात आली आहे. २१ ऑक्टोबरपासून शहरात दर सोमवार आणि मंगळवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने यापूर्वीच जाहीर केले आहे. एकंदर टंचाईसदृश परिस्थिती असताना महापालिकेने येत्या काळात शहरातील पाणी चोरांना हुडकून काढण्याची मोहीम हाती घेण्याचे ठरविले आहे.

आठवडाभरात कारवाई सुरू होणार

  • कल्याण- डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामे व चाळींमधून दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे.
  • चोरीच्या जोडण्या देणारी एक टोळी या भागात कार्यरत असून महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्य तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे आयुक्त बोडके यांनी चोरीच्या नळजोडण्यांवर कारवाईचे आदेश दिले आहे.
  • शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे कारण पुढे करत अनेक गृहनिर्माण संस्था बुस्टर पंप लावून पाण्याचा दाब वाढवत आहेत. अशा सोसायटय़ांविरोधात तातडीने मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना बोडके यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
  • येत्या आठवडाभरात मोठी मोहीम शहरात सुरू केली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal water boring in thane
Show comments