८१ व्या वर्षांच्या मोतीलाल धोंगडेंची कहाणी
शिक्षणाच्या इच्छाशक्तीला प्रामाणिक प्रयत्नांची जोड दिली तर अंगठे बहाद्दूर व्यक्तीही केवळ साक्षरच नव्हे तर लेखकही होऊ शकते, हे टिटवाळ्यातील मोतीलाल धोंगडे यांनी त्यांच्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.
मोतीलाल धोंगडे मूळचे पुणेकर. घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे ते कधी शाळेत गेले नाहीत. त्याऐवजी पोटाची खळगी भरण्यासाठी अगदी लहान वयातच त्यांना किराणा मालाच्या दुकानात मजुरी करावी लागली. मात्र त्यांना शब्दांचे आकर्षण होते. आपल्याला वाचता आले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे दुकानात किमान मालाची यादी वाचण्यापुरती अक्षरओळख व्हावी म्हणून एका सहकाऱ्याकडून ते चार अक्षरे शिकले. मात्र अक्षरांची ही ओळख केवळ व्यवहारापुरती मर्यादित राहिली नाही. हाती येईल ते सारे वाचण्याचा छंद त्यांना जडला. पुढे किराणा माल दुकानात नोकरी करतानाच ते वाचू लागले. त्यातून त्यांच्या ज्ञानात भर पडत गेली. विचार प्रगल्भ होत गेले. ज्ञानार्जनाचा हा प्रवास तिथेच थांबला नाही. मनातले विचार ते कागदावर उतरवू लागले. निरनिराळ्या नियतकालिकांमधून त्याला प्रसिद्धी मिळू लागली. अशा रीतीने एक निरक्षर व्यक्ती केवळ साक्षरच नव्हे, तर चक्क लेखक झाली. सध्या ते विविध शाळांमध्ये जाऊन मुलांना शिक्षण तसेच वाचन विषयक मार्गदर्शन करीत आहेत.
८१ वर्षांचा तरूण
सेवा निवृत्तीनंतर टिटवाळ्यात स्थायिक झालेल्या मोतीलाल धोंगडे यांनी ‘मी कसा शिकलो’ आणि ‘साक्षर लिहितो अक्षरगाथा’ अशी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. यापुढे त्यांना आध्यात्मिक विषयावर लेखन करायचे असून त्यासाठी त्यांचे चिंतन, मनन सुरू आहे. आता ८१ व्या वर्षीही तरुणाला लाजवेल असा उत्साह असलेले मोतीलाल सातत्याने वाचन, चिंतन आणि मनन करण्यात मग्न असून विविध शाळांमध्ये व्याख्याने देतात.