ठाणे: ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात मंगळवारी, आज, ५९५ देवी मुर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी सुमारे चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जणार आहे. शिवाय, शहरातील वाहतूकीत बदल लागू करण्यात आलेले असून घोडबंदर मार्गावर दुपारी २ वाजेनंतर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. टेंभीनाका येथील देवीच्या विसर्जनादरम्यान रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी देखील पोलिसांचे विशेष पथक तैनात असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर हि शहरे ठाणे आयुक्तालय क्षेत्रात येतात. ठाणे शहरात २५५, भिवंडीत ८७, कल्याण-डोंबिवलीत १३३ आणि उल्हासनगर ते बदलापूर येथील शहरी भागात १२० इतक्या सार्वजनिक देवी मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी या देवी मुर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी सुमारे चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जणार आहे. यामध्ये ४४९ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन हजार पोलीस कर्मचारी, ७०० गृहरक्षक दल, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, दंगल नियंत्रण पथके यांचा समावेश असेल. विसर्जनाच्या ठिकाणी श्वान पथकांकडून पाहणी केली जाणार आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत लेडिज बारमध्ये ग्राहकांना बेदम मारहाण

घोडबंदर येथील गायमुख विसर्जन घाट परिसरात मोठ्याप्रमाणात देवी मुर्तीचे विसर्जन करण्यात येते. यंदाही याठिकाणी विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे वाहतुक पोलिसांनी या मार्गावर दुपारी दोन वाजेनंतर अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे. विसर्जन संपेपर्यंत ही बंदी असणार आहे. येथील वाहने चिंचोटी, कामण, अंजुरफाटा, मानकोली, भिवंडी मार्गे वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांचा भार वाढण्याची शक्यता आहे. टेंभीनाका येथील देवीच्या विसर्जनासाठी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अतिमहत्त्वाचे काही व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेही चोख बंदोबस्त असणार आहे.

साध्या वेषातील काही पोलीस कर्मचारीही उपस्थित असतील. तसेच येथील महत्त्वाच्या चौकात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याद्वारे या भागावर लक्ष ठेवण्यात येईल. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चौका-चौकात पोलीस बंदोबस्त असणार आहे. देवी विसर्जनावेळी या भागात गर्दी उसळून तलावपाली, गोखले रोड, राम मारूती रोड, कोर्टनाका, जांभळीनाका भागात कोंडी होण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immersion of 595 goddess idols in thane today dvr