ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रातील नदी पात्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. यामुळे पुर्ण क्षमतेने पाणी उपसा करणे शक्य होत नसून केवळ ५० टक्के पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच, ११ जुलैपर्यंत ही समस्या कायम राहणार असल्याने ऐन पावसाळ्यात शहरात टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी हे स्रोत महत्वाचे मानले जातात. यातील ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेसाठी भातसा नदीच्या पात्रावर पिसे येथे तर, स्टेम प्राधिकरणाने उल्हास नदीच्या पात्रावर शहाड येथे पाणी उपसा केंद्र उभारलेले आहे. या दोन्ही केंद्रावरून पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होत नसल्याने ठाणे शहरात रविवारपासून सुमारे ५० टक्के कमी पाणी पुरवठा होत आहे.

ऐन पावसाळ्यात ठाण्यात पाणी टंचाई; पाणी उपसा केंद्रात जमा झालेल्या गाळामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम

हेही वाचा >>>टिटवाळ्याजवळील गोवेलीत गुरचरण जमिनींवरील हाॅटेल्स, गाळे जमीनदोस्त; महसूल विभागाची कारवाई

शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीवरील पिसे तर उल्हास नदीवरील शहाड पाणी उपसा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. यामुळे नदी पात्रातून पुरेशा प्रमाणात पाणी उपसा करणे शक्य होत नसून त्याचबरोबर जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. त्यामुळे रविवारपासून ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. या दोन्ही केंद्रात पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे, ठाणे शहराच्या विविध भागात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या पुढील तीन दिवस म्हणजेच ९, १० आणि ११ जुलै, २०२४ रोजी कायम असणार आहे. या काळात पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

पाणी उपसा केंद्रात दरवर्षी अडकतो कचरा 

ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड या पाणी उपसा केंद्रामध्ये अतिवृष्टीमुळे गाळ आणि कचरा वाहून येतो. हा कचरा पाणी उपसा करणाऱ्या पंपाच्या मुखाशी अडकतो आणि यामुळे नदी पात्रात पुरेसे पाणी असूनही नेहमीपेक्षा कमी पाणी उपसा होतो. दरवर्षी हि समस्या निर्माण होते. यंदाच्या वर्षीही पहिल्याच पावसात ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नदी पात्रात पुरेसे पाणी असूनही ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impact on water supply due to silt accumulation in water pumping station thane amy
Show comments