बदलापूरः बदलापुरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातील एक 335 अश्वशक्ती क्षमतेचा पंप बंद पडल्याने त्याचा बदलापूर, अंबरनाथ या शहरांच्या पाणी पुरवठ्यावर आज परिणाम पहायला मिळाला. पाणी उचल क्षमता निम्म्यावर आली. परिणामी दोन्ही शहरातील बहुतांश भागात पाणी पोहोचलेच नाही. तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. सोमवारी तातडीने या पंपाचे दुरूस्तीकाम सुरू करण्यात आले.
बदलापूर, अंबरनाथ या शहरांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे उल्हास नदीवरील बॅरेज बंधारा येथून पाणी उचलून जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया करते. त्यानंतर हे पाणी जलवाहिन्यांतून संपूर्ण बदलापूर शहराला, अंबरनाथच्या काही भागात तर आयुध निर्माणीला पुरवले जाते. सध्या पावसामुळे आणि गेल्या आठवड्यात उल्हास नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे या केंद्राच्या कामावर परिणाम झाला होता. रविवारी रात्री या जलशद्धीकरण केंद्रातील 335 अश्वशक्ती क्षमतेचा एक पंप बंद पडला. त्यामुळे रविवारी रात्रीपासून जलशुद्धीकरण केंद्रात होणारी पाणी उचल निम्म्या क्षमतेवर आली होती. त्याचा परिणामी सोमवारी सकाळी पहायला मिळाला. पाणी उचल बंद पडल्याने अंबरनाथ शहरातील काही भागात तर बदलापूर शहराच्या बहुतांश भागात सोमवारी सकाळी पाणी पुरवठा झाला नाही. काही मोजक्या भागात कमी दाबाने पुरवठा झाला. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात नागरिकांना पाण्यावाचून काढावे लागले. सकाळीच या नादुरूस्त पंपाच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली आहे. काही तासात पाण्याचा पुरवठा सुरू होईल. तसेच मंगळवारी सुरळीत पाणी येईल, असेही अभियंत्यांनी सांगितले आहे.