ठाणे : पुणे येथील तरुणावरील लैंगिक अत्याचार प्रकरण, महिला सुरक्षा, बीड येथील सरपंचाची हत्या, राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्थेचे प्रकरण ताजे असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शनिवारी राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक ठाण्यातील रेमंड गेस्ट हाऊसमध्ये घेत आहेत. या बैठकीस राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई, ठाणे राज्यभरारातील अतवरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

स्वारगेट येथे शिवशाही बसगाडीमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीला अटक झाली असली तरी राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे अल्पवयीन मुली, तरुणी, महिला यांचे अपहरण, अत्याचाराच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. तसेच बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देखील सरकावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. ठाण्यात कोयते, तलवारी घेऊन काही गुंडानी दहशत पसरविण्याचा देखील प्रयत्न केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा आरोप करत महायुती सरकारवर विरोधक आणि महाविकास आघाडीचे नेते झोड उठवित आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठाण्यात राज्यातील सर्व पोलीस अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक रेमंड येथील गेस्ट हाऊसमध्ये आयोजित केली आहे.

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा समारोप शनिवारी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तत्त्पूर्वी ते शनिवारी सकाळी ही बैठक घेत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. या बैठकीस राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई, ठाणे पोलीस आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या भागातील पोलीस आयुक्त, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदा सुव्यवस्थे विषयी आढावा घेणार आहेत. तसेच पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती यात घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री फडवणीस हे पोलीस अधिकाऱ्यांना कोणते आदेश देणार आहेत हे आता पाहावे लागणार आहे.

Story img Loader