कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदासाठी सर्व पक्षीय निवडक सदस्यांची बुधवारी निवड करण्यात आली. यामध्ये महापालिकेतील सर्व पक्षांतील काही मातब्बरांची वर्णी लागली आहे.
महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी युतीमध्ये करारनामा करण्यात आला. त्यानुसार महापौर पद शिवसेनेकडे देण्यात आले. भाजपकडे दोन वर्ष स्थायी समिती सभापतीपद राहणार आहे. स्थायी समिती सदस्य निवडीसाठी आज महासभा घेण्यात आली. स्थायी समितीत शिवसेनेचे आठ, भाजपचे आठ, मनसेचा एक, काँग्रेसचा एक सदस्य निवडण्यात आला. राष्ट्रवादीला पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांच्या नगरसेवकाला सदस्यत्व मिळाले नाही. शिवसेनेकडून नगरसेवक दशरथ घाडीगावकर, कासिम तानकी, मोहन उगले, राजाराम पावशे, राजवंती मढवी, प्रेमा म्हात्रे, हर्षली थवील, राजेश मोरे, भाजपतर्फे शैलेश धात्रक, संदीप गायकर, रमाकांत पाटील, विकास म्हात्रे, शिवाजी शेलार, विशाल पावशे, मनसेकडून ज्योती राजन मराठे, काँग्रेसतर्फे जान्हवी पोटे यांची स्थायी समितीत वर्णी लावण्यात आली आहे.
पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला साथ देणाऱ्या काही अपक्षांना शिवसेनेने स्थायी समितीत पद देऊन त्यांना पहिल्याच फेरीत समाधानी करण्यात धन्यता मानली आहे. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या एका नगरसेवकाने ‘आपणास स्थायी समितीत घेतले नाही, तर कोणतेच पद यापुढे नको’ असे सुनावले होते. त्यामुळे या नगरसेवकाची वर्णी लावण्यात आली. भाजपच्या हातात दोन वर्ष पालिकेची तिजोरी राहणार असल्याने ते मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेली सुंदर नगरी कशी प्रत्यक्ष कृतीत उतरवतात, अशी चर्चा शहरवासीयांमध्ये सुरू झाली आहे. सभागृहनेते पदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेश मोरे, विरोधी पक्षनेतेपदी मनसेचे नगरसेवक प्रकाश भोईर यांची निवड करण्यात आली आहे.