अंबरनाथ येथील सीएनजी पंपाच्या मुख्य गॅस वाहिकेच्या देखभाल, दुरुस्तीचे काम महानगर गॅसकडून सात ते नऊ मार्च या कालावधीत अत्यावश्यक परिस्थीमुळे हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी अंबरनाथसह कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली परिसरातील महानगर गॅसचे सीएनजी पंप येत्या शनिवार (ता.९) पर्यंत बंद राहणार आहेत, असे महानगर गॅसने जाहीर केले आहे. वाहन चालकांची गैरसोय नको म्हणून जिल्ह्यातील काही सीएनजी पंंपांवर गॅस मिळेल अशी व्यवस्था केली आहे, असे महानगर गॅसने स्पष्ट केले आहे.

तीन दिवस सीएनजी पंप बंद राहणार असल्याची माहिती मिळताच रिक्षा चालकांनी गैरसोय नको म्हणून डोंबिवली, कल्याण, शिळफाटा, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरातील महानगर गॅसच्या सीएनजी पंपांकडे धाव घेतली. पण तेथे बंदचे फलक रिक्षा, खासगी वाहन चालकांना आढळून आले. त्यामुळे रिक्षा चालकांना पेट्रोल टाकून तीन दिवस प्रवासी वाहतूक करावी लागणार आहे. पेट्रोलपेक्षा सीएनजी गॅसवर होणारी प्रवासी वाहतूक आर्थिक फायद्याची असल्याने अलीकडे बहुतांशी रिक्षा चालक सीएनजी गॅसला प्राधान्य देत आहेत.

हेही वाचा… ठाणेकरांनो… कोंडी टाळण्यासाठी शहरात मोठे वाहतूक बदल! बाहेर पडण्याआधीच जाणून घ्या…

भारतीय गॅस प्राधिकरणाकडून अंंबरनाथ येथील सिटीगेट स्टेशन पंपाला गॅस पुरवठा केला जातो. या केंद्रातून परिसरातील पंपांना तो वितरित केला जातो. अंबरनाथ येथील मुख्य गॅस वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम तातडीने भारतीय गॅस प्रधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील सीएनजी गॅस पुरवठा पंपांवर त्याचा परिणाम होणार आहे. हे काम गुरुवार (ता.७) ते शनिवार (ता.९) या कालावधीत सुरू राहणार आहे, असे गॅस प्राधिकरणाने जाहीर केले आहे.

रिक्षा, खासगी वाहन चालकांची गैरसोय म्हणून ठाणे जिल्ह्यातील महानगर गॅसने २२ सीएनजी पंपांवर गॅस मिळेल अशी व्यवस्था केली आहे. यामध्ये इंंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोल पंप आणि खासगी पंप चालकांचा समावेश आहे.

हेही वाचा… मुंबई : कर्जत, कसारा, बदलापूरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या कायम उशिरा का असतात? प्रवाशांचा संतप्त सवाल

डोंबिवली, कल्याण भागातील अनेक रिक्षा चालकांनी भिवंडी परिसरात जाऊन महानगर गॅसच्या पंपावर गॅस भरण्याचे प्रयत्न केले. सीएनजी गॅस पंप बंद राहणार असल्याची माहिती मिळाल्यापासून गुरुवारी रात्रीपासून रिक्षा चालक सीएनजी पंपांवर गॅस मिळेल या अपेक्षेने रिक्षा घेऊन धावत आहेत. एकदा रिक्षेत चार किलो सीएनजी भरला की त्याव्दारे दोन ते तीन दिवस अनेक रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करतात. कमी इंधनात अधिक दिवस प्रवासी वाहतूक करून आर्थिक लाभ मिळत असल्याने रिक्षा चालक सीएनजी गॅसला सर्वाधिक पसंती देत आहेत, असे रिक्षा चालक राकेश गुप्ता यांनी सांगितले.

सुरू असलेले पंप

खोणी, पागड्याचापाडा,-डोंबिवली, शेलार, अवचितपाडा, कुरेशीनगर,चाविंद्रेगाव, वळगाव, नारपोली, माणकोली, कवाड-भिवंडी, काटई नाका, कांबा-कल्याण, बेतवडे, वाशी, गोवेली, तळोजा रस्ता.

Story img Loader