ठाणे : युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, हा आम्ही मांडलेला विचार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वीकारला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानावेसे वाटतात, असे सांगत छप्पन इंच वगैरे या गोष्टी भाषणापुरत्या ठीक आहेत. पण, वास्तवात त्याचा काही उपयोग नसतो, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देत आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीकडे पहात नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी ठाण्यात आल्या होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चीनच्या भारतीय सीमेवरील कुरापतींबाबतचा विषय महत्वाचा असून हा विषय भारताने गांभीर्याने घेण्यासारखा आहे. परंतु आपण संसदेमध्ये अनेक वेळा युद्धविरोधी भूमिका घेतली आहे. युद्धामध्ये केवळ महिला विधवा होतात आणि बालके अनाथ होतात. युद्धाने प्रश्न सुटत नाहीत. आम्ही मांडत असलेला हा विचार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वीकारला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानावेसे वाटतात, असे खासदार सुळे यांनी सांगितले. तसेच छप्पन इंच वगैरे या गोष्टी भाषणापुरत्या ठीक आहेत. पण, वास्तवात त्याचा काही उपयोग नसतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
आज देशामध्ये स्टार्टअपची जी चर्चा सुरू आहे. परंतु केंद्र सरकारचाच अहवाल सांगतो की, देशातील सर्वात जास्त स्टार्टअप कुठे असतील तर ते केवळ महाराष्ट्रातच आहेत, असेही त्या म्हणाल्या.
शिवसेना शाखेला भेट
बाळकूम परिसरात ज्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे, त्याच परिसरात शिवसेनेची शाखा आहे. सुप्रिया सुळे यांचे आगमन झाल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी सुनील पाटील, वासुदेव भोईर आणि संतोष भोईर यांनी त्यांना शिवसेना शाखेत येण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण स्वीकारत त्या शिवसेना शाखेत गेल्या.